Accident in Aundh Bhalekar Chowk due to bad road
बाणेर/पुणे: औंध येथील भाले चौकात हॉटेल राहुलसमोर नागरस रोडवर काँक्रीट आणि ब्लॉकमधील भाग खचला आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या अपघातात दुचाकीवर जाणार्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. महापालिकेच्या पथ विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करीत या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला.
पिण्याक गंगोत्री सोसायटीमध्ये राहणार्या जगन्नाथ काळे या ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी घसरून ते रस्त्यावर पडले आणि पाठीमागून येणार्या चारचाकी वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी रस्त्यावरील काँक्रीट व ब्लॉकमधील भाग खचला असून, त्यामुळे रस्त्यावर असमतोल तयार झाल्याने दुचाकी घसरून हा अपघात झाला. (Latest Pune News)
या आधीही या ठिकाणी अपघात झाले असून, प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. औंध, बाणेरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघात होत आहेत, याला पथ विभाग जबाबदार असल्याचे या वेळी नागरिकांनी सांगितले.
अपघात झाल्यानंतर अॅड. मधुकर मुसळे आणि माजी नगरसेवक अर्चना मुसळे यांनी नागरिक आणि अधिकार्यांसोबत या रस्त्यावर समन्वय बैठक घेतली. महापालिका प्रशासनाच्या कार्यकाळात शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून पथ विभागाच्या दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जगन्नाथ काळे यांचा नाहक जीव गेल्याचे या वेळी अॅड. मुसळे यांनी सांगितले.
महापालिकेचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, अभियंता दिलीप काळे, उपअभियंता देवकर, कनिष्ठ अभियंता स्वाती गनपिले, वाहतूक विभागाचे अधिकारी चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.