

Land dispute leads to firing between cousins in Pune
पुणे: जमिनीच्या वादातून एकाने गावठी पिस्तुलातून चुलत भावावर गोळीबार केल्याची घटना नगर रस्त्यावरील केसनंद परिसरात गुरुवारी (दि. 31) रात्री घडली. गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्टनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुशील संभाजी ढोरे (वय 42, रा. ढोरेवस्ती, केसनंद, नगर रस्ता) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर सचिन राजाराम ढोरे, गणेश चंद्रकांत जाधव, भिवराज सुरेश हरगुडे (तिघे रा. केसनंद, नगर रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, सचिन आणि भिवराज या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Pune News)
जमिनीचा वाद सोडविण्यासाठी सुशील हा त्यांचे चुलत भाऊ दत्ता ढोरे यांच्याबरोबर वाडेबोल्हाई परिसरात गुरुवारी रात्री गेला होता. आरोपी सचिन आणि दत्ता यांच्यात जमिनीचा वाद सुरू होता. वादात सुशीलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी सचिन त्याच्यावर चिडला. सचिनकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते.
वादातून त्याने त्याच्याकडील बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलातून सुशीलवर गोळीबार केला. पिस्तुलातून सुटलेली गोळी सुशीलच्या शरीरातून आरपार गेली. त्यामुळे गंभीर जखमी झाला. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिनकडून बेकायदा बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहे.