Pashan Sus Grade Separator Pudhari
पुणे

Pashan Sus Grade Separator: सूसखिंडीत ग्रेड सेपरेटरचे काम संथ; अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय

काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बाणेर: पाषाण-सूस रस्त्यावरील सूसखिंड येथे महामार्गाला जोडणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम महापालिका प्रशासनाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, कामाच्या संथगतीमुळे तसेच अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या परिसरात सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.पाषाण-सुतारवाडी परिसरातील नागरिकांच्या मागणीनंतर महामार्गाला जोडणाऱ्या या ग्रेड सेपरेटरच्या कामास सुरुवात करण्यात आली.

मात्र, काम सुरू असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड योग्य प्रकारे बसविण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रविवारी (दि. १२ जुलै) जोरदार वाऱ्यामुळे एक बॅरिकेड कोसळून एका नागरिकाला दुखापत झाल्याची घटना घडली.

कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड वजनदार असून, ते सुरक्षितपणे बसविण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच, ग्रेड सेपरेटरचे काम अपूर्ण असल्याने महामार्गावर जाणाऱ्या वाहनचालकांना अनेकदा विरुद्ध दिशेचा वापर करावा लागत आहे.

यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढत असल्याने हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात काहिसा विलंब झाला. त्यामुळे कामाची गती मंदावली असली तरी डिसेंबरपर्यंत ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण करण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड उभारण्यात आले आहेत. बॅरीकेड कोसळून अपघात झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, बॅरीकेड अधिक सुरक्षितपणे बसविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात येतील.
- शिवानी यादव, कनिष्ठ अभियंता, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT