

NEET 2026 Result Shravani Kudale topper from Maharashtra
रावणगाव: राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA मार्फत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट या परीक्षेचा निकाल काल गुरुवारी (दि. १६) जाहीर झाला. यात दौंड तालुक्यातील खडकी येथील श्रावणी कृष्णा कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण मिळवून देशात ५ वा क्रमांक तसेच महाराष्ट्र व ओबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील मुलींनी प्रथमच बाजी मारल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. खडकी या तिच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तिला शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशामध्ये आई शिक्षिका जयश्री कुदळे, वडील शिक्षक कृष्णा कुदळे तसेच शिक्षक दाम्पत्य चुलता व चुलती यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
श्रावणी हिचे पहिली ते पाचवी शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी येथील चोरमले वस्ती या ठिकाणी झाले. माध्यमिक शिक्षण शारदाबाई पवार विद्यानिकेतन कॉलेज माळेगाव या ठिकाणी येथे झाले. या सर्व गोष्टी करत असताना तिने वर्षभर मोबाईलचा वापर केला नाही, तसेच समाज माध्यमांपासून दूर राहिली.
ही परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता तिला तिचे आई-वडील, चुलता-चुलती हे सर्व शिक्षक असल्याने मोलाची साथ व मार्गदर्शन लाभले. सततचा अभ्यास तसेच सराव करत तिने पहिल्याच प्रयत्नात बाजी मारत हे यश मिळवले. वारकरी संप्रदायातील घराणे असल्याने त्याचा आदर्श वारसा जपत तीने उज्वल यश प्राप्त केले. या यशामुळे तिचे सर्व स्तरातून परिसरातून ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे
श्रावणी कुदळे हिच्या यशाने खडकी गावाचे नाव राज्य सह देशात गाजल्याने आम्हा खडकीकरांना तिचा सार्थ अभिमान आहे. श्रावणीच्या आई-वडिलांनी गावातच ज्ञानदानाचे उत्तम प्रकारचे काम केले. म्हणतात ना शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी
- ज्योती शिंदे, प्रशासक, सरपंच खडकी
माझ्या या यशाचे श्रेय सक्सेस कोड अकॅडमी बारामती येथील अण्णासाहेब भुजबळ व विराज येळे यांना जाते. मोबाईल व समाजमाध्यमातून दूर राहिल्यामुळे अभ्यासावरील फोकस कमी झाला नाही. ग्रामीण भागातील असून सुद्धा सातत्यपूर्ण अभ्यास व निश्चित ध्येय ठेवून प्रयत्न केल्यास हे यश आपण प्राप्त करू शकतो.
- श्रावणी कुदळे, नीटमध्ये राज्यात प्रथम विद्यार्थिनी