Fake Foreign Liquor Seized: Pudhari
पुणे

Fake Foreign Liquor Seized: एक्साईजने पकडला एक कोटी ३५ लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा; पाषाण भागात कारवाई

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारूकांडानंतर अवैध मद्य व्यवसायाविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठे यश मिळाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पाषाण भागात कंटेनरवर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) १ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपयांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.

या कारवाईमुळे आंतरराज्यपातळीवर कार्यरत असलेल्या बनावट मद्यतस्करीच्या जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारूकांडानंतर अवैध मद्य व्यवसायाविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठे यश मिळाले आहे.

पप्पूलाल भिखाराम बिष्णोई (वय ३४) याला अटक केली आहे. जप्त केलेल्या मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला १० जून रोजी सुतारवाडी परिसरात उभ्या असलेल्या एका कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित कंटेनरची झडती घेतली. तपासणीदरम्यान गोव्यात तयार केलेले, मात्र मध्य प्रदेशातील बनावट लेबलांचा वापर करून विक्रीसाठी सज्ज केलेले विदेशी मद्य आढळून आले. कंटेनरमध्ये 'रॉयलसिलेक्ट डिलक्स व्हिस्की' या ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या बाटल्यांचे १२ हजार ९६० बॉक्स आढळले.

या मद्याचे एकूण प्रमाण १० हजार ३६८ बल्क लिटर इतके आहे. तपासादरम्यान वाहनचालकाकडे मद्यवाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना किंवा वाहतूक पास नसल्याचे उघड झाले. तसेच, त्याने सादर केलेली करचलने (टॅक्स इनव्हॉइस) आणि अन्य कागदपत्रेही बनावट असल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला आहे.

या कारवाईत अंदाजे १ कोटी २० लाख ९९ हजार रुपयांचा मद्यसाठा, १५ लाख रुपये किमतीचे कंटेनर वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

...कारवाया सुरूच राहणार

विषारी दारूकांडानंतर राज्यभर अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बनावट मद्याच्या साखळीचा माग काढून त्यामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू असून, अशा प्रकारच्या कारवाया आगामी काळात आणखी तीव्र केल्या जाणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT