Pashan Illegal Showrooms Pudhari
पुणे

Pashan Illegal Showrooms: पाषाणमध्ये डीआरडीओ परिसरात अनधिकृत शोरूम; न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

500 मीटर प्रतिबंधित क्षेत्रात पुन्हा उभारली दुकाने; कारवाईसाठी महापालिकेची कोर्टात धाव

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पाषाण परिसरातील सुतारवाडीमध्ये मुंबई-पुणे महामार्गालगत डीआरडीओच्या एचईएमआरएल या प्रयोगशाळेच्या 500 मीटर परिघात कोणतीही बांधकामे करण्यास व दुकाने उभारण्यास मनाई असताना देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत फर्निचर शोरूमची दुकाने थाटण्यात आली आहेत. येथे कारवाई केल्यावर न्यायालयाने ‌‘जैसे थे‌’चे आदेश देऊनही या आदेशाची पायमल्ली करून पुन्हा दुकाने थाटली आहेत. या दुकानांविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेने कोर्टात याचिका दाखल करत कारवाई करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

डीआरडीओच्या एचईएमआरएल या प्रयोगशाळेच्या 500 मीटर प्रतिबंधित क्षेत्रात उभारलेल्या 25 शोरूम दुकानांवर 1 मार्च 2024 रोजी महापालिकेने कारवाई करत येथील 3 लाख चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकाम हटवले होते. त्यानंतर येथील शोरूम मालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ‌‘जैसे थे‌’ स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला होता. तसेच, जर बांधकाम आधीच पाडण्यात आले असेल, तर त्या ठिकाणी कोणतेही नवे बांधकाम किंवा बदल करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करत पुन्हा दुकाने थाटली आहेत.

महापालिकेच्या पाहणीदरम्यान संबंधितांनी पुन्हा नूतनीकरण करून त्या ठिकाणी दुकाने थाटल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईसाठी पथक घटनास्थळी गेले असता संबंधितांकडून न्यायालयीन मनाई आदेश दाखवून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पुढील कारवाईला अडथळे निर्माण होत आहेत.

बड्या नेत्याच्या आदेशामुळे थांबली होती कारवाई?

एचईएमआरएलच्या 500 मीटर क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात शोरूम व हॉटेल उभारण्यात आली आहे. पाषाण सुतारवाडी येथील महामार्गालगत असलेल्या या फर्निचर शोरूमवर 2024 मध्ये कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई करताना त्या वेळी एका बड्या अधिकाऱ्याने फोन करत कारवाई थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ही कारवाई अपूर्ण राहिली, अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

पाषाण सुतारवाडी येथील महामार्गालगत फर्निचर शोरूमवर 2024 मध्ये कारवाई केली होती. त्या वेळी काही शोरूम मालक सर्वोच्च न्यायालयात गेले होते. कोर्टाने महापालिकेने कारवाई थांबावी व जैसे थे परिस्थिती कायम ठेवत शोरूम मालकांनी पुन्हा बांधकाम करू नये असे आदेश दिले होते. मात्र, शोरूम मालकांनी या आदेशाची पायमल्ली करत पुन्हा दुकाने थाटली आहे. यावर कारवाईच्या विचारात आम्ही आहोत.
सुरेंद्र करपे, कार्यकारी अभियंता, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT