पुणे : शहरातील महत्त्वाच्या असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील 2014 पासून झालेल्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचाच वरचष्मा राहिला आहे. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये 28 पैकी जवळपास 25 नगरसेवक एकट्या भाजपचेच राहिले आहेत. नवीन प्रभागरचनेमुळे मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपला पोषक अशीच स्थिती निर्माण झाली आहे. (Pune Latest News)
पर्वती विधानसभा मतदार संघातील येणार्या प्रारूप प्रभागांच्या रचनेत बिबवेवाडी-महेश सोसायटी (प्रभाग 20) हा नवीन प्रभाग अस्तित्वात आलेला आहे. तरीसुध्दा गतवेळी या ठिकाणी चारही नगरसेवक हे भाजपचेच विजयी झालेले आहेत. या ठिकाणचे नगरसेवक सुनील कांबळे हे कॅन्टोन्मेंट विधानसभेवर आमदार म्हणून विजयी झाले आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांना अस्तित्वासाठी मोठी लढत दयावी लागेल.
मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्कवरही (प्रभाग 21) भाजपचेच 2002 पासून वर्चस्व राहिले. विधानसभा निवडणुकीत या प्रभागाने भाजपला मोठी साथ दिलेली आहे. मागील निवडणुकीत चारही नगरसेवक भाजपचेच होते. त्यामुळे विरोधी पक्षांना मोठी कसरत याठिकाणी करावी लागण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
काशेवाडी-डायस प्लॉट (प्रभाग 22) हा दोन विधानसभा मतदार संघात विभागला आहे. त्यामध्ये काही भाग कॅन्टोन्मेंट व पर्वती विधानसभा मतदार संघातील आहे. येथे भाजपला दोन जागा, कॉग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजयी मिळाला होता.
नवी पेठ-पर्वती (प्रभाग 27) या प्रभागही दोन विधानसभा मतदार संघात विभागला आहे. त्यामध्ये अर्धा भाग हा कसबा विधानसभा मतदार संघातील आहे. मात्र, मागील मनपा निवडणुकीत येथील चारही नगरसेवक हे भाजपाचेच राहिले आहे.
जनता वसाहत-हिंगणे खुर्द (प्रभाग 28) या मतदार संघावरही भाजपचेच वर्चस्व आहे. दाट लोकवस्ती आणि उच्चभु— सोसायट्यांमध्येही भाजपने येथे एकहाती वर्चस्व कायम ठेवलेले आहे.
सहकारनगर-पर्वती (प्रभाग 36) मध्ये भाजपचे दोन तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे भाजपला लाभ होण्याची दाट शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे..
अपर-सुपर इंदिरानगर (प्रभाग 39) मध्ये तीन नगरसेवकांचा प्रभाग राहिला होता. आता चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने कोणत्या नवीन उमेदवाराला भाजपकडून मनपाचे तिकिट मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मागील निवडणुकीत शिवसेनेचे बाळा ओसवाल हे निवडून आले होते. मात्र, नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवीन प्रभाग रचना त्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे.
एकंदरीत पर्वती विधानसभा मतदार संघातील मतदारांचा कल पाहता भाजपलाच मागील निवडणुकीप्रमाणे यश मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.