पुणे :पूजासामग्री, मखर, आभूषणे, विद्युतमाळा, पडदे, फुलांची आरास, अशा विविध साहित्याच्या खरेदीसाठी सोमवारी (दि. 25) बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळाली अन् पावसाच्या सरीतही पुणेकरांनी सायंकाळी गणेशोत्सवाच्या खरेदीचे निमित्त साधले.
गणेशोत्सवाला बुधवारपासून (दि. 27) सुरुवात होणार असल्याने रविवार पेठेतील बोहरी आळी, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्त्यासह फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसरात खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. तर, महात्मा फुले मंडईमध्ये पूजेच्या साहित्याच्या खरेदीसह हरितालिका पूजनासाठी लागणार्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ विद्युतमाळांच्या रोषणाईने उजळले होते, तर मोदकसह मिठाई खरेदीसाठीही प्राधान्य दिले.
गणेशोत्सवासाठीची तयारी सगळीकडे जोमाने सुरू असून, घरोघरी सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घरोघरीही वेगवेगळ्या संकल्पनांनुसार सजावट करण्यात येत असल्यामुळे खासकरून सोमवारी सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी बोहरी आळीमध्ये गर्दी झाली. फुलमाळांपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या मखर खरेदीवर अनेकांनी भर दिला.
मंडईमध्ये अगरबत्तीपासून ते कापूरपर्यंतच्या पूजासाहित्याची खरेदी अनेकांनी केली, तर मध्यवर्ती पेठांसह कुमठेकर रस्त्यासह फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर आदी ठिकाणी असलेल्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीच्या स्टॉलवर अनेकांनी मूर्तींची आगाऊ नोंदणीही केली. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. रविवार पेठेतील बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन, टिळक रस्ता अशा विविध ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांना जोडणार्या उपरस्त्यांवरही हीच स्थिती होती. कोंडीतून वाट काढणेही अनेकांना कठीण जात होते.