एकच ध्यास... हीरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक पटकावयाचाच! अंतिम फेरीत होणार नऊ संघांचे सादरीकरण pudhari
पुणे

Purushottam Karandak: एकच ध्यास... हीरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक पटकावयाचाच! अंतिम फेरीत होणार नऊ संघांचे सादरीकरण

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी महाविद्यालयीन संघांतील विद्यार्थ्यांची जोरदार तयारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्राथमिक फेरीत नाट्य संकल्पना, संवाद लेखन आणि अभिनयाकडे विशेष लक्ष दिले. प्रत्यक्ष सादरीकरणावेळी ज्या त्रुटी राहिल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. अंतिम फेरीतील सादरीकरण परिपूर्ण व्हावे, यासाठी आमच्या संघातील प्रत्येक जण तयारी करत आहेत.

यंदाच्या हीरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सहभाग आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे, अशी भावना अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आस्था काळे हिने व्यक्त केली. (Latest Pune News)

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरकमहोत्सवी स्पर्धेच्या पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरण्यासाठी अंतिम फेरीतील नऊ संघ करंडक पटकावयाचाच, या जिद्दीने आणि ध्यासाने स्पर्धेत उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन संघातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी आस्था काळे बोलत होती.

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या नऊ संघांची अंतिम फेरी भरत नाट्य मंदिरात होणार आहे. उद्या शनिवारी (दि.13) आणि रविवारी (दि.14) संघांचे सादरीकरण होणार आहे. महाविद्यालयीन संघांमधील विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीसाठी जोरदार तयारी केली आहे. प्राथमिक फेरीत राहिलेल्या त्रुटी दूर करून नव्या ऊर्जेने हे तरुण कलाकार एकांकिका सादरीकरणासाठी सज्ज आहेत.

अंतिम फेरीचे वेळापत्रक

शनिवारी (दि.13) - वेळ : सायंकाळी 5 - यथा प्रजा, तथा राजा (मएसो. सिनिअर कॉलेज), पावसात आला कोणी... (मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय), रामरक्षा (आयएमसीसी स्वायत्त)

रविवार (दि. 14) - वेळ : सकाळी 9 - काही प्रॉब्लेम आहे का? (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर), व्हिक्टोरिया (डीईएस पुणे युनिव्हर्सिटी), निर्वासित (श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय),

वेळ : सायंकाळी 5 - आतल्या गाठी (स. प. महाविद्यालय), कोयता (पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय), वामन आख्यान (मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड)

स्पर्धेच्या पहिल्या वर्षापासून महाविद्यालयाने दर्जेदार एकांकिका दिल्या आहेत. स्पर्धेचे हीरकमहोत्सवी वर्ष असल्याने स्पर्धेतील सहभाग आमच्या दृष्टीनेही मोलाचा आहे. सलग तिसऱ्या वर्षी आमचे महाविद्यालय अंतिम फेरीत पोहोचले आहे.
- उर्व चिंचवडे, स. प. महाविद्यालय
महाविद्यालय अंतिम फेरीत चौथ्यांदा पोहोचले आहे. स्पर्धेचे दडपण आहे; परंतु प्रयोग व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आहेच. दशावतारावर नाटक आधारित असल्याने आम्ही बराच अभ्यास केला. स्पर्धेमुळे जुन्या परंपरांचा अभ्यास झाल्याने अंतिम फेरीतील सादरीकरणाची उत्सुकता आहे.
- अनिकेत खरात, मॉडर्न महाविद्यालय (गणेशखिंड).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT