

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड येथील जयप्रकाश नारायण- नगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिकेच्या शाळेसमोर सात मुलांना चावा घेतल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
शाळा सुटल्यावर शाळेसमोर खेळत असलेल्या या मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. यामुळे जयप्रकाश नारायण नगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याबाबत नागरिक कोंडीबा बाळशंकर आणि वंचित बहुजन युवा आघाडी खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी तत्काळ सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांनी माहिती दिली. (Latest Pune News)
त्यांनी खडकवासला येथे महापालिकेच्या दवाखान्याच्या डॉक्टरांशी संपर्क साधून जखमी मुलांवर तातडीने उपचार करण्यास सांगितले. यात दोन मुले जास्त जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सुत्रांना मिळाली.
रहिवासी गौतम कांबळे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे कुत्रे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांनाही शाळेत ये-जा करताना या कुत्र्यांच्या त्रास सहन करावा लागत आहे.
दुचाकी चालवणेदेखील अवघड
नांदेड परिसरात भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. विविध भागांतून या वसाहतीत कुत्री आणून सोडली जातात. ही कुत्री रस्त्याने जाणाऱ्या दुचाकींच्या पाठीमागे लागतात. यामुळे दुचाकीचालक घाबरून जात असून, त्यांना दुचाकी चालवणेदेखील मुश्किल होत आहे.
कुत्रे हल्ला करीत असल्याने दुचाकीस्वार घसरून पडून अपघात होत आहेत. महापालिका प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची गरज आहे. नाही तर निष्पाप नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नांदेड परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवनमान धोक्यात आले आहे. हे कुत्रे नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण झाले आहे.
- मधुकर दुपारगुडे, रहिवासी, नांदेड
नांदेड येथील जयप्रकाश नारायणनगरमध्ये ताबडतोब श्वान पथक पाठवून पिसळलेल्या आणि भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यात येईल. तसेच या घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येईल.
- प्रज्ञा पोतदार, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय