

खडकवासला: हवेली तालुक्यातील सोनापूर, वरदाडे, मालखेड, आंबी भागात तलाठी कित्येक दिवसांपासून येत नसल्याने येथील शेतकरी, आदिवासींना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. सुस्तावलेल्या महसूल प्रशासनामुळे शेतकरी, आदिवासी बांधवांसह विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
सिंहगड भागातील मालखेड, वरदाडे, सोनापूर, आंबी आदी लहान गावातील नागरिकांची कामे मार्गी लागावीत यासाठी शासनाने स्वतंत्र महसूल सजा तयार केले आहेत. फक्त आंबी गावचा अपवाद वगळता इतर सर्व गावात स्वतंत्र तलाठ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. मात्र, तलाठी गावात फिरकत नाहीत. (Latest Pune News)
सोनापूर, वरदाडे, मालखेड, आंबी, येथे अनेक आठवडे तलाठी येत नाही. वरदाडे येथे तलाठी कार्यालयासाठी जागा नसल्याने तलाठी फिरकत नाही. मालखेड येथे कार्यालयाची इमारत नादुरुस्त असल्याने तलाठी येत नाही. पानशेतजवळील आंबी गावच्या सजामध्ये येण्यास तलाठी नाखुश आहेत. त्यामुळे तलाठ्याची जागा सजा निर्माण झाल्यापासून रिक्तच आहे.
कमी क्षेत्र व खातेदार असलेल्या लहान गावात स्वतंत्र सजा निर्माण करण्यात आले. मात्र, सिंहगड पायथ्याच्या खामगाव मावळ व मोगरवाडी या दोन महसुली गावांसाठी स्वतंत्र सजा तयार केली नाही. या गावांचा समावेश खानापूर सजामध्ये करण्यात आला आहे.
त्यामुळे खामगाव मावळ, मोगरवाडी, चांदेवाडी, खरमरी, माळवाडी आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांना खानापूरपर्यंत वीस ते पंचवीस किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत आहे. शेतकरी, आदिवासींसह रहिवाशांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळावा, महसुली कारभार गतिमान होण्यासाठी खानापूर येथे स्वतंत्र मंडल कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कार्यालयातही मंडल अधिकारी आठवड्यात फक्त दोनच दिवस येतात, त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबतात.
महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शासकीय योजनांपासून नागरिक वंचित राहात आहेत. शेती नुकसानीचे पंचनामे वेळेवर होत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळत नाही. सर्व सजात दर आठवड्यात किमान चार दिवस तलाठी उपस्थित राहावेत, सजासाठी इमारत उभारण्यात यावी, तोपर्यंत उपलब्ध जागेत कामकाज करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खानापूर कार्यालयात नियमितपणे तीन दिवस येत आहे. इतर दिवशीही कामकाज केले जाते. आंबी गावचा कारभार दुसऱ्या तलाठ्याकडे तात्पुरता दिला आहे. लवकरच तो रुजू होईल. इतर गावांतील तलाठ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित तलाठ्यांना सूचना दिल्या जातील.
- गौतम ढेरे, मंडल अधिकारी, खानापूर विभाग