Panshet Dam Pudhari
पुणे

Panshet Dam Water Level: पानशेत धरण ९८ टक्के भरले; वांजळवाडी सांडव्याचे दरवाजे उघडले, मुठा नदीत विसर्ग वाढला

खडकवासला धरणसाखळीत ९३.७२ टक्के पाणीसाठा; धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून पानशेत धरणाचे विधिवत जलपूजन

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने १०० टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पानशेत धरणाच्या मुख्य वांजळवाडी सांडव्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. २८) रात्री अकरापासून सांडव्यातून १,७१४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच, खडकवासला धरणातून बुधवारी सकाळी ६ वाजता मुठा नदीपात्रात होणाऱ्या विसर्गात वाढ करून तो ४,७०८ क्युसेकपर्यंत करण्यात आला.

खडकवासला धरणसाखळीत बुधवारी सायंकाळी पाच वाजता २७.३२ टीएमसी म्हणजेच ९३.७२ टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या २४ तासांत धरणसाखळीत ०.४७ टीएमसीची भर पडली असून, खडकवासला धरणातून ०.१६ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी घाटमाथ्यावर रिमझिम पाऊस सुरू आहे. पानशेत व वरसगाव धरण परिसरात हलका पाऊस पडत आहे.

पानशेत धरणातून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून ६०० क्युसेक आणि वांजळवाडी सांडव्यातून १,७१४ क्युसेक पाणी सोडले जात असतानाही धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्यांहून अधिक आहे. वरसगाव (वीर बाजी पासलकर) धरणातील पाणीसाठा ९२.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ म्हणाले, 'धरणमाथा परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील दापसरे, कुर्तवडी, शिरकोली आणि माणगाव परिसरात रिमझिमसह सरी कोसळत आहेत. त्यामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत.'

पानशेत धरणाचे जलपूजन

खडकवासला धरणसाखळीतील पानशेत (तानाजीसागर) धरण जवळपास शंभर टक्के भरल्याने बुधवारी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी धरणाचे विधिवत जलपूजन केले. या वेळी शिवकालीन वैभवशाली इतिहासाला उजाळा देत पूर्वजांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक भगवान पासलकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच धरणातील आंबी नदीला साडी-चोळी अर्पण करून जलपूजनाचा विधी पार पडला. १९५७ मध्ये पानशेत धरण उभारल्यानंतर राजगड तालुक्यातील २४ गावे पाण्याखाली गेली. या गावांसह शिवकालीन घरे, वाडे, वास्तू, मंदिरे, वीर मावळ्यांच्या समाधी आणि ऐतिहासिक वारसा धरणात बुडाला. वडिलोपार्जित शेती, घरे आणि शिवकालीन संस्कृतीचा वारसा गमावलेल्या धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच पुणे शहराच्या विकासाला आणि पाणीपुरवठ्याला बळ मिळाले, अशी भावना यावेळी व्यक्त केली.

या वेळी पानशेत धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता सुमित धामणे, अंकुश पासलकर, तानाजी पासलकर, शांताराम ठाकर, मोहन वायकर, मावळा जवान संघटनेचे कार्याध्यक्ष रोहित नलावडे, संजय दारवटकर, बाबा पानसरे, गणेश तारू, प्रशांत देशपांडे, विजय पासलकर, प्रशांत पोरे, दत्ता निढाळकर आदींसह धरणग्रस्त शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT