Leopard Pudhari
पुणे

Panshet Leopard Attack: पानशेतच्या आंबीत रंगले बिबट्याचे थरार नाट्य

जीव वाचवताना बांधावरून पडून म्हशीचा मृत्यू : निमाचीवाडी जवळील तुकाई माळरानावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला : पानशेतजवळील आंबीमध्ये सोमवारी (दि.९) दुपारी एका धष्टपुष्ट बिबट्याचे थरारनाट्य रंगले होते. हल्ला करणाऱ्या बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी पळताना शेताच्या बांधावरून खाली कोसळून दीपक गणपती निवंगुणे यांच्या ऐंशी हजार रुपये किमतीच्या म्हशीचा मृत्यू झाला.

आंबीमधील निमाचीवाडीजवळील तुकाई माळरानावर नेहमीप्रमाणे चार-पाच शेतकरी गायी, बैल, वासरे, म्हशी अशी जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले होते. दीपक निवंगुणे यांच्या जनावरांच्या कळपातील एक म्हैस आडबाजूला झुडपात चरत होती. त्यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या एका धष्टपुष्ट बिबट्याने अचानक म्हशीवर हल्ला केला. त्यावेळी जोरदार हंबरडे फोडत म्हैस जीव वाचवण्यासाठी धावत सुटली.

म्हैस आठ महिन्यांची गाभण होती. बिबट्याने पाठलाग केल्याने मोठ्या बांधावरून पडून जागेवरच ती गतप्राण झाली. आम्ही आरडाओरडा केल्याने बिबट्या जंगलात पसार झाला
- दीपक निवंगुणे, म्‍हशीचे मालक, आंबी

बिबट्या म्हशीचा पाठलाग करत असल्याचे पाहून दीपक निवंगुणे, संजय बाबूराव निवंगुणे व इतर शेतकरी भयभीत झाले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला. बिबट्याच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी पळताना शेताच्या बांधावरून खाली कोसळून म्हशीचा जागीच मृत्यू झाला.

आंबी, पानशेत परिसरात बिबट्यांची मोठी दहशत आहे. त्यामुळे गुराखी रानात एकत्रितपणे जनावरे चारण्यासाठी घेऊन जात आहेत. बिबटे गुराख्यांसमोर जनावरांचा फडशा पाडत आहेत. वन विभागाने संबंधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
- शंकरराव निवंगुणे, स्‍थानिक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT