Solar Pudhari
पुणे

Panmandwadi Solar Power Project: पानमंदवाडीतील सौरऊर्जा प्रकल्पामुळे २,५०४ शेतकऱ्यांना दिवसा वीज

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ५ मेगावॅट प्रकल्पाचे लोकार्पण; उभारणीसाठी २० कोटी ७५ लाखांचा खर्च

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी, दिवसा वीज, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतमालासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींवर शासन सातत्याने काम करीत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात येणार्‍या सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होण्याबरोबरच शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण येथे केले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत खेड तालुक्यातील पानमंदवाडी येथे उभारण्यात आलेल्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी (दि. ४) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ऑनलाइन बटन दाबून करण्यात आले. चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी हा सोहळा झाला. या प्रकल्पामुळे कडूस वीज उपकेंद्रांतर्गत २५०४ शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

कडूस उपकेंद्रांतर्गत एकूण ८ हजार ६४३ वीजग्राहक असून, त्यामध्ये २५०४ कृषी ग्राहकांचा समावेश आहे. वाढत्या विजेच्या मागणीचा विचार करून उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त उच्चदाब रोहित्र बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उपकेंद्राची एकूण क्षमता १५ एमव्हीए होणार आहे.

या वेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील आणि चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे उपस्थित होत्या. महावितरणतर्फे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी तसेच अवाडाचे फतेहसिंग आणि मुर्तुजा काझी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

सौरऊर्जेचा उपयोग शेतीपंपांसाठी होणार

पानमंदवाडी येथील या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी अवाडा कंपनीने केली असून, त्यासाठी सुमारे २० कोटी ७५ लाख रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पात निर्माण होणारी वीज सुमारे ५.८ किलोमीटर लांबीच्या ११ केव्ही वाहिनीद्वारे ३३ केव्ही कडूस उपकेंद्रापर्यंत आणण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सौरऊर्जेची निर्मिती करून तिचा उपयोग शेतीपंपांसाठी करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT