Pankaja Munde on OBC reservation
पुणे: ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ओबीसी समाजासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे, असे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (दि.4) सांगितले.
पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या दर्शनानंतर बोलताना पंकजा मुंडे यांनी ही महत्त्वाची विधाने केली. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. त्या पुढे म्हणाल्या, मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआरमुळे आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले आहे. (Latest Pune News)
मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही, यासाठी सरकारने काळजी घेतली आहे. याच हेतूने ओबीसींसाठी एक समिती स्थापन केली आहे, जी या प्रकरणाचा अभ्यास करेल. आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हे दोन भिन्न विषय आहेत.
तसेच, त्यांनी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे, असे म्हणत, ओबीसी समाजाला ग्वाही दिली. जीआरमुळे काही अन्याय होत असल्याचे वाटत असेल तर दोन महिन्यांचा वेळ आहे, त्यात आम्ही सर्व काही तपासून पाहू, असेही त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांनी शेवटी, सर्व समाज आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदावे, अशी आपली इच्छा व्यक्त केली. सरकार यातून सुवर्णमध्य काढेल, अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केल्याचेही सांगितले.