Pudhari Diwali Swar Sandhya 2025 Pudhari
पुणे

Diwali Swarsandhya Pudhari: गायक हे स्वर ईश्वराचे पुजारी असतात...

ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांची भावना

पुढारी वृत्तसेवा

पुणे : गायकाने स्वतःच्या गायनाचा आनंद घेतला पाहिजे, तेव्हाच तो गायनात समरस होतो. मंदिर आणि मठामध्ये देवी-देवतांना पुजारी अभिषेक करतात तेव्हा पुजाऱ्यांपेक्षा भाविक अधिक त्या दिव्यत्वाचा आनंद घेत असतात, तसेच गाण्याचेही आहे. आम्ही गायक सुरांना सजवतो आणि रसिक त्या सुरांचा आनंद घेत त्याला दाद देतात. गायक त्या स्वर ईश्वराचे पुजारी आहेत. स्वरक्षेत्र अधिक नादबह्म व्हावे, यावर गायकाने भर दिला पाहिजे, अशी भावना आहे ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांची. दै. ‌‘पुढारी‌’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच उद्या, शनिवारी (दि. 18) मंगल स्वरांची सूरमयी मैफल - ‌‘दिवाळी स्वरसंध्या‌’ हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.(Latest Pune News)

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहेत. हा कार्यक्रम कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री नऊ वाजता होणार आहे. त्यात पंडित रघुनंदन पणशीकर आणि गायिका मंजुषा पाटील यांच्या गायकीचा स्वरानंद रसिकांना घेता येणार आहे. पं. रघुनंदन पणशीकर यांनी विविध मुलाखतींमधून व्यक्त केलेल्या भावना, मते याचे संकलन दै. ‌‘पुढारी‌’ने केले असून, ते वाचकांसाठी सादर करत आहोत. कार्यक्रमाचे फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड तर एज्युकेशन पाटर्नर ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आहेत. तर ॲकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता ग््रुाप ऑफ इन्स्टिट्यूट्‌‍स आहेत. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक कोहिनूर ग््रुाप, अमर बिल्डर्स, नाईकनवरे बिल्डर्स आणि संजय काकडे ग््रुाप आहेत.

दिवाळी स्वरसंध्या कार्यक्रम आनंद देणारा : पं. रघुनंदन पणशीकर

माझ्या गुरू किशोरी आमोणकर यांनी मुंबईत पहाटे दिवाळीचा कार्यक्रम सादर करून दिवाळी पहाट कार्यक्रमांची सुरुवात केली होती. तेव्हापासून दिवाळी पहाट कार्यक्रमांची परंपरा सुरू झाली आणि ती अविरतपणे सुरू आहे. नेहमीच दिवाळी पहाटचे कार्यक्रम होत आहेतच. त्याचा यंदाच्या दिवाळीतही आनंद घेता येणार आहेच. पण, दै. ‌‘पुढारी‌’ने आयोजित केलेला दिवाळी स्वरसंध्या हा कार्यक्रम रात्री होणार आहे, हे वेगळेपण आहे. त्यात आम्ही शास्त्रीयपासून ते नाट्यगीते सादर करणार आहोत. तसेच, दिवाळीवर आधारित एक बंदिशही सादर करणार आहे, त्यामुळे रसिकांची दिवाळीची रात्र ही सुरेल व्हावी, हा त्यातून प्रयत्न आहे. दै. ‌‘पुढारी‌’ने हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याचा आनंद आहे, असे ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. रघुनंदन पणशीकर यांनी दै. ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले.

कार्यक्रम कधी : शनिवारी, 18 ऑक्टोबर

कुठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

वेळ - रात्री नऊ वाजता कार्यक्रम वेळेत सुरू होईल,

याची रसिकांनी नोंद घ्यावी.

प्रवेशिकांना कोथरूडमधील रसिकांकडून प्रतिसाद

दिवाळी स्वरसंध्या हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांना कोथरूडमधील रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोथरूडवासियांनी या संगीतमय मेजवाणीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आपल्या प्रवेशिका राखून ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या प्रवेशिका विनामूल्य

कार्यक्रमाच्या प्रवेशिका रसिकांसाठी उपलब्ध झाल्या असून, कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. एका प्रवेशिकेवर एकाच व्यक्तीस प्रवेश असेल आणि प्रथम येणाऱ्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.

दै. ‌‘पुढारी‌’च्या कार्यालयात मिळतील प्रवेशिका

दैनिक पुढारीच्या कार्यालयातही रसिकांना कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळणार आहेत. पर्वती येथील मित्रमंडळ चौकातील (पाटील प्लाझासमोर) पुढारी कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी सहा या वेळेत प्रवेशिका मिळतील.

येथेही मिळतील कार्यक्रमाच्या प्रवेशिका

कर्वे रस्त्यावरील देसाई बंधू आंबेवाले येथे सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड यांच्या कोथरूड येथील चार शाखांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 आणि टिळक रस्त्यावरील ग््रााहक पेठेत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका मिळतील. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवेशिका उपलब्ध असतील. याशिवाय बेडेकर गणपती मंदिराचे सभागृह, कोथरूड येथेही कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळतील. येथे सकाळी 9 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत प्रवेशिका उपलब्ध असणार आहेत.

प्रश्न : गुरू गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याविषयी काय सांगाल?

उत्तर - मी महाविद्यालयात असताना माझे काका दाजी पणशीकर आणि बाबा प्रभाकर पणशीकर यांनी माझा सुरांशी परिचय करून दिला. तेव्हापासून माझ्या मनात संगीताविषयीची आवड निर्माण झाली. मग, गुरू शोध सुरू झाला. बाबांनी रणजित देसाई यांच्या तुझी वाट वेगळी नाटकाची निर्मिती केली. त्याचे संगीत गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी द्यावे, असे त्यांच्या मनात होते. मी गाणे शिकत होतोच, त्यामुळे किशोरीताईंना संगीतात साथ म्हणून मी रोज त्यांच्या घरी जायला लागलो. किशोरीताईंकडून मी गाणे शिकेन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. हा सुवर्णक्षण माझ्या आयुष्यात आला आणि तो क्षण आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. मला वाटले नव्हते की, किशोरीताई मला गुरू म्हणून लाभतील. त्यांची भेट आणि त्यांनी मला केलेले मार्गदर्शन हा माझ्यासाठी भाग्ययोग होता. ताई म्हणजे निर्मिती असे म्हणायला हरकत नाही. किशोरीताईंचे गाणे हे दैवी होते, त्यांच्या गायनाने नेहमीच मला प्रभावित केले. रागातील भाव जपण्याकडे त्यांनी भर दिला. किशोरीताईंनी मला सर्व गायन प्रकार शिकवले.

प्रश्न : गुरू मोगुबाई कुर्डीकर यांच्याविषयी काय सांगाल?

उत्तर - मोगुबाई कुर्डीकर यांनी आम्हा शिष्यांना अनेक बंदिशी शिकवल्या. फक्त कंठाच्या माध्यमातून म्हणजेच गळ्याच्या माध्यमातून आपण एखादी तान म्हणू शकतो हे मी त्यांच्याकडून शिकलो. कुर्डीकर यांनी अनेक गोष्टी शिकवल्या. गायकीत स्वतःची शैली जपा, असे त्या सतत सांगत. गुरूंचे अनुकरण करा, पण स्वतःच्या गायकीचे पैलू आत्मसात करा, हा विचार त्यांनी दिला. आम्ही त्यांना माई म्हणायचो. माईंचे मौलिक संदेश आजही माझ्यासोबत आहेत.

प्रश्न : किशोरीताईंच्या शिकवणीचा तुमच्यावर काय प्रभाव पडला?

उत्तर - किशोरीताईंनी गायनाचा दिलेला विचार आजही माझ्यासोबत आहे. त्या गाताना नेहमी तटस्थ असायच्या. त्यांनी उत्तम गायकी तर मला शिकवलीच पण जीवनाकडे सकारात्मकेने कसे पाहावे, हेही शिकवले. आयुष्य जगताना प्रत्येक गोष्टीकडे कसे पाहावे, याची शिकवण मला त्यांनी दिली. आत्मिक प्रेम, स्वरांचे प्रेम काय असते, हे त्यांनी मला शिकवले. त्या माझ्या गायन गुरू आहेतच. पण, अध्यात्मिक गुरूही आहेत.

प्रश्न : आपल्या स्वरांच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?

उत्तर - लहानपणी देवळात होणारी कीर्तने कानावर पडायची. शाळेत असताना आगाशे गुरुजी यांनी मला गाण्यासाठी निवडले. पहिलेच नाटक दिले त्यात मला नारद यांची भूमिका दिली. मी तिसरी किंवा चौथीत असताना ईश्वरी इच्छा होती की मी गायन करावे. त्यामुळे गायनाची सुरुवात झाली. त्यानंतर मी वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे गाणे शिकत होतो. कट्यार काळजात घुसली या नाटकात मी छोट्या सदाशिवची भूमिका केली. नाटकाच्या 75 प्रयोगात मी काम केले. कुठेतरी या नाटकामुळे मी गायन क्षेत्रात आलो. गायन संस्कार माझ्यावर आपोआपच होत गेले. किशोरीताईंकडे मी जेव्हा गायन शिकण्यासाठी रुजू झालो, त्यावेळी गायन हेच आनंद मानून मी गायन क्षेत्राकडे वळलो. माझी 20 वर्षे ही तंबोरे, स्वरमंडल लावणे आणि किशोरीताईंचे दैवी संगीत ऐकण्यात गेलेली आहेत. याला मी स्वर्गाची नोकरी असे म्हणतो. माझा आत्तापर्यंतचा स्वरप्रवास हा मला खूप आत्मिक समाधान देणारा आहे.

प्रश्न : रागसंगीताविषयी तुम्ही काय सांगाल?

उत्तर - कुठल्याही रागाची जी बंदिश आहे ती बंदिश जवळजवळ पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभर रोज सारखीच म्हणायची. हे करून त्या रागाचा चेहरा तुमच्या मनात हळूहळू स्पष्ट होत जातो. त्यानंतर आलापी करायची पद्धत येते. त्यात मोठे राग, छोटे राग, उत्तरांग आणि पूर्वांग अशा वेगवेगळ्या पद्धतीचे राग आहेत. शेवटी राग म्हणजे भाव आहे. राग हा वातावरण निर्मिती करतो. प्रत्येक रागाचे एक वेगळे वातावरण आहे. पूर्वसुरींनी जे राग बनवलेले आहेत त्यातून त्यांना त्यातील भाव दिसत असणारच. हा भाव मानवी जीवन आणि निसर्गासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही फक्त सूर सुरात लावा आणि रागाचे चलन आडवा. त्यानंतर रागातील भाव वातावरणावर, लोकांच्या मनावर चांगला परिणाम करतो. त्यातून लोक सुसंस्कृत होतात. गायकाचे गायन हे रागातील भावाला अनुकूल असे झाले पाहिजे. रागात करुण, शृंगार भाव असेल त्या अनुकूल तुमचे अलंकार तुम्हाला निवडता यायला हवेत. प्रत्येक रागाचे भाव वेगवेगळेच असतात, त्यात साचेबद्धपणा नसतो.

प्रश्न : घराण्याबद्दल तुम्हाला काय वाटते?

उत्तर - घराणे हे आपल्याला गायनाची विशिष्ट चाकोरी दाखवते. एक शिकवण आपल्याला देते. पण, पुढे आपण घराण्याच्या गायकीसोबत स्वतःचीही एक वेगळी शैली निर्माण केली पाहिजे. सगळ्यांचे गाणे ऐकून आपण त्यातील योग्य वाटेल ते आपण घ्यावे. सगळे गुरू हेच म्हणतात. आपण आदानप्रदान शिकले पाहिजे. दुसऱ्यांच्या गायकीतून काहीतरी शिका, हे मला गुरूंनी सातत्याने सांगितले. मी हाच मंत्र घेऊन पुढे शिकत राहिलो. जुन्या मंडळींच्या गायकीतून शिकत गेलो.

प्रश्न : उत्तम गायकासोबतच तुम्ही उत्तम संगीतकारही आहात, त्याबद्दल सांगाल?

उत्तर - विचारवंत गायक हा संगीतकारही असतो. कारण तो काहीना ना काही सारखा रचतच असतो. मी परफेक्ट संगीतकार नाही, पण मी चांगला रचियता आहे. मला रचना करायचा छंद लागला. माझ्या बाबांनी मला ‌‘अवघा रंग‌’ नाटकात चाल लावायला सांगितली. ते माझ्यासाठी आव्हानात्मक होते. पण, रसिकांना ते संगीत आवडले. पुढे मी काही नाटकांना, मी काही म्युझिक अल्बमलाही संगीत दिले. मला संस्कृत, बंगाली आणि कन्नड भाषेतील रचना गायला आवडतात. त्यातील लेहजा जाणून घेणे, हे मला आवडते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT