

पुणे : टोळीयुद्धातून खून आणि खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांनंतर शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरक्षेच्या दृष्टीने कुंपण बंदिस्त करण्यापासून ते सीसीटीव्ही बसविण्यापर्यंत आदी सर्व कामे प्रशासनाकडून करण्यात आली. न्यायालय तसेच पोलिस यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीमुळे न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था सक्षम होत असतानाच मागील वर्षभरात दोन जणांनी न्यायालयात आत्महत्या केली. वर्षभरात घडलेल्या या घटनांमुळे न्याय मागण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षकारांकडून न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.(Latest Pune News)
शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी तसेच दिवाणी दाव्यांचे कामकाज चालते. खटल्याच्या सुनावणीच्या निमित्ताने येथे हजारो वकील आणि पक्षकार दररोज येत असतात. न्यायालय परिसर हा सर्वसाधारणपणे सुरक्षित मानला जातो. मात्र, अशा दुर्दैवी घटना घडत असल्याने न्याय मागणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस यंत्रणा असतानाही अशा घटना रोखण्यात अपयश येत असल्याने, सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटींवर बोट ठेवले जात आहे. या घटनांमुळे न्यायालयीन वातावरणावर परिणाम होत असून, न्याय मिळवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्याची मागणी पुढे येत आहे.
न्यायालयातील आत्महत्येच्या घटना चिंताजनक आहेत. न्यायालयात सुरक्षित व निष्पक्ष वातावरण असावे अशी अपेक्षा असते, पण अशा घटना ती विश्वासार्हता कमी करतात. पोलिस व सुरक्षा यंत्रणेकडून अधिक जागरूकता व कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत. केवळ सुरक्षा कर्मचाऱ्यांची उपस्थिती पुरेशी नाही; न्यायालयीन प्रक्रियेतील ताण कमी करण्यासाठी मानसिक सहाय्यही आवश्यक आहे.
ॲड. अभिषेक हरगणे, फौजदारी वकील
ही घटना केवळ व्यक्तीगत दुःखाचे कारण नसून, न्यायालयीन व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करते. आत्महत्येची ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा, मानसिक आरोग्यतज्ज्ञ आणि न्यायालयीन प्रशासन यांच्यातील समन्वय आवश्यक आहे. नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी येताना सुरक्षिततेची हमी देणे न्यायालयाची प्राथमिक जबाबदारी आहे.
ॲड. अजित पवार, फौजदारी वकील
घटस्फोटाच्या निमित्ताने 8 फेबुवारी रोजी सोहेल येणीघुरे (28, रा. पाषाण) हा तरूण आपल्या पत्नी आणि मुलांसह न्यायालयात आला होता. शनिवारची सुट्टी असल्याने न्यायालयात वर्दळ नव्हती. येथील सोसायटी कार्यालय येथे बसले असताना त्याचे पत्नीशी वाद झाले. त्यानंतर, त्याने पत्नीची ओढणी घेत चिंचेच्या झाडावर चढून गळफास घेतला.
वडिलोपार्जित जमिनीचा वाद मागील 25 वर्षांपासून प्रलंबित असल्याने त्याच्या सुनावणीसाठी नामदेव यशवंत जाधव (वय 61, रा. वडकी) हे 8 ऑक्टोबर रोजी न्यायालयात दाखल झाले. यादरम्यान, न्यायालयीन प्रक्रीयेला कंटाळून त्यांनी नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. यामध्ये, गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.