रात्रीच्या सफाईनंतरही दुर्गंधी हटेना; पनगरांसह शहरात जागोजागी ढीग Pudhari
पुणे

Garbage Problem: रात्रीच्या सफाईनंतरही दुर्गंधी हटेना; पनगरांसह शहरात जागोजागी ढीग

मोजक्याच भागांत स्वच्छता, समाविष्ट गावांतील परिस्थिती वाईट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणेकरांना कचर्‍याच्या प्रश्नातून मुक्त करण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार रात्री 10 ते 6 यादरम्यान स्वच्छता कर्मचारी शहरातील रस्त्यांची झाडलोट करून परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, ही स्वच्छता होत असताना देखील शहरातील रस्त्यांवर कचरा ‘जैसे थे’ आहे.

काही मोजक्याच भागांत चोखपणे स्वच्छता केली जात आहे. तर शहरातील काही भाग, उपनगरांसह समाविष्ट गावांत कचरा उचला जात नसल्याचे ‘पुढारी’च्या पाहणीत आढळून आले आहे. एकीकडे शहर कचरापेट्यामुक्त करण्यात आले आहे. मात्र, शहर कचरामुक्त कधी होणार? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. (Latest Pune News)

पुणे शहर स्वच्छ व सुंदर राहावे व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहराच्या स्वच्छतेचा मुद्दा चांगलाच मनावर घेतला आहे. पुणेकर जागे झाल्यावर त्यांना शहर स्वच्छ दिसावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून रात्रीच शहराची स्वच्छता केली जात आहे.

यासाठी पालिकेच्या जवळपास 1490 कर्मचार्‍यांची रात्रीची ड्युटी लावून शहराची स्वच्छता केली जात आहे. मात्र, असे असताना देखील शहराच्या अनेक भागांत कचरा पडून राहत आहे. याबाबत ‘पुढारी’ने शहराच्या विविध भागांत भल्या पहाटे जाऊन पाहणी केली. काही ठिकाणी पालिकेचे कर्मचारी शहर स्वच्छ करताना आढळले. मात्र, ही स्वच्छता झाल्यावर काही बेशिस्त पुणेकर पुन्हा रस्त्यावर कचरा टाकत आहेत.

काही भागांत पालिकेचे कर्मचारी फिरकत नसल्याने पहाटे कचरा रस्त्यावर पडून राहत आहे. स्वच्छता ही काही भागांतच होत असल्याचे आढळले. तर उपनगर आणि समाविष्ट गावांत रात्री शहर स्वच्छ करण्याची महापालिकेची कोणतीच यंत्रणा फिरकत नसल्याचे आढळले. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकून दिला जात आहे.

हा कचरा रस्त्यावरच पडून असून, तो उचलण्याची तसदी ना पालिकेचे कर्मचारी करीत आहेत, ना स्वच्छ संस्थेचे कर्मचारी. यामुळे आयुक्तांच्या घोषणेलाच हरताळ फासला जात आहे. तसेच नगरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.

रोज उचलला जातो 240 टन कचरा

आयुक्तांच्या आदेशानंतर सुरू करण्यात आलेल्या रात्रीच्या स्वच्छता मोहिमेत रोज जवळपास 200 ते 240 मेट्रिक टन कचरा उचला जातो. मात्र, असे असतानादेखील शहरात जागोजागी कचरा पडून राहत आहे. कचरा उचलताना व्यावसायिक भागाला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे इतर भागांकडे दुर्लक्ष होत आहे.

1490 कर्मचारी रस्त्यावर, तरीही शहर स्वच्छ होईना

रात्री शहर स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेचे तब्बल 1490 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना आधुनिक साधनेदेखील दिली आहेत. रात्री 10 ते पहाटे 6 या वेळेत मुख्य रस्त्यांसह व्यावसायिक भाग, अंतर्गत रस्ते हे कर्मचारी स्वच्छ करतात. मात्र, काही मोजक्याच भागांत प्रामाणिकपणे शहराची स्वच्छता केली जाते. शहरात इतर भागांत मात्र रस्त्यावर कचरा पडून आहे.

शहरात रात्री स्वच्छता केली जात आहे. मात्र, ही स्वच्छता काही ठिकाणीच होत आहे. शहरात कुठेही फिरल्यास अनेक ठिकाणी कचरा पडून राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महानगरपालिकेची ही मोहीम म्हणजे फार्स ठरली आहे.
- अनिकेत देसाई, नागरिक
शहर रात्री स्वच्छ करण्यासाठी घनकचरा विभागाच्या कर्मचार्‍यांची ड्युटी लावण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत रोज रात्री शहर स्वच्छ केले जाते. सकाळी 6 पर्यंत ही स्वच्छता होते. तर त्यानंतर दुपारी 2 पर्यंत दुसर्‍या शिफ्टमधील कर्मचारी शहर स्वच्छ करतात. संपूर्ण शहर, उपनगर व समाविष्ट गावांत स्वच्छता होणे अपेक्षित आहे. यासाठी वॉर्डस्तरावर देखील कारवाई व्हायला हवी. तशा सूचना आम्ही दिल्या आहेत.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग, पुणे महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT