Nurses protest at Sassoon Hospital Pune
पुणे: सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातही परिचारिकांनी संप पुकारला. मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळापर्यंत संप सुरू राहणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. एकूण परिचारिकांपैकी जवळपास निम्म्या परिचारिका संपावर गेल्यामुळे रुग्णसेवेवरही परिणाम झाला. (Latest Pune News)
अधिपरिचारिका, परिसेविका, पाठ्यनिर्देशिका या पदारील कार्यरत कर्मचार्यांच्या वेतन त्रुटी दूर करणे तसेच परिचारिकांची कंत्राटी भरती रद्द करून तत्काळ 100 टक्के कायमस्वरूपी पदभरती सुरू करण्यात यावी, रिक्त पदे तत्काळ पदोन्नतीने भरण्यात यावी, 40 वर्षांपासून परिचारिकांचे प्रलंबित असलेले भत्ते मंजूर करावे व इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय, लातूर यांच्या नेतृत्वाखाली 17 जुलै रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले.
मागण्यांची दखल न घेतल्यास 18 जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत तीव्र कामबंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, पुणे शाखेच्या अध्यक्षा आरिफा शेख, सचिव विनय देसाई व सर्व पदाधिकार्यांनी दिली.
ससून रुग्णालयात तीन शिफ्टमध्ये 939 परिचारिका कार्यरत आहेत. त्यापैकी 345 परिचारिकांनी संप पुकारला. इतर परिचारिका कामावर असल्याने रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नाही.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.