Banner Controversy Pudhari
पुणे

Banner Controversy: पालकमंत्र्यांचा फोटो स्वागत फलकांवर नसल्याने नाराजी; महापौर राजकारण करीत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

सेवा वारीच्या नावाखाली महापौर राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून लावण्यात आलेल्या स्वागतपर जाहिरात फलकांवर पुण्याच्या पालकमंत्र्यांचाच फोटो नसल्याने नाराजीनाट्य रंगले आहे. सेवा वारीच्या नावाखाली महापौर राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी केला आहे.

शहरात दोन्ही पालख्यांच्या स्वागताचे महापालिकेने फलक लावले आहेत. त्यावर महापौर मंजूषा नागपुरे व महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे फोटो आहेत, तर प्रोटोकॉलच्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो टाकण्यात आले.

परंतु, पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो मात्र या जाहिरात फलकांवर नाही. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या फलकांवर पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो पाहिजे होता.

शासकीय कार्यक्रमाचा प्रोटोकॉल माहीत नाही की महापौर मुद्दाम विसरतात, या गोष्टीचे आकलन होत नाही, असे म्हणत निकम यांनी विरोधी पक्षनेता म्हणून निषेध व्यक्त केला आहे.

तसेच, या विषयावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी महापौरांना समज देऊन त्यांच्याकडून स्पष्टीकरण घ्यावे, अशी मागणी निकम यांनी केली आहे. दरम्यान, नगर सचिव कार्यालयाकडून हे फलक लावले नसल्याचे सांगण्यात आले.

पालकमंत्र्यांनी केली कानउघाडणी

महापालिकेच्या स्वागतपर फलकांवर फोटो नसल्याने स्वत: पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी महापालिका आयुक्तांची कानउघाडणी केली असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यावर आयुक्तांनी हे फलक नक्की कोणी लावले, याची माहिती मागविली असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT