पुणे : पुढारी वृत्तसेवा
'आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य आदी सर्व सोयीसुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, पालखी मार्गावरील प्रलंबित कामे 10 जूनपर्यंत पूर्ण होतील,' अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बैठकीला पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माणिक मोरे आदी उपस्थित होते.
'दोन वर्षांनंतर पालखी सोहळा होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक संख्या राहण्याचा अंदाज आहे. भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, त्यासाठी गेली 3-4 महिन्यांपासून पालखीबाबत नियोजन सुरू आहे. या वर्षीचा पालखी सोहळा आगळावेगळा राहील, यादृष्टीने सर्व नियोजन प्रभावीपणे करण्यात येईल. पालखीमार्ग, पालखी मुक्काम या ठिकाणच्या लक्षात आलेल्या सर्व त्रुटी 10 जूनपर्यंत दूर कराव्यात. या वर्षीची वारी अधिक प्रभावीपणे 'निर्मल वारी' व्हावी, यासाठी सर्व ते प्रयत्न करू,'असेही डॉ. देशमुख म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद म्हणाले, 'या वर्षी गतवेळच्या वारीपेक्षा दीडपट अधिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. शौचालयांच्या ठिकाणी वीज, पुरेसे पाणी आदी व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.' 'गेली दोन वर्षे कोरोनामुळे वारीचे स्वरूप छोटे होते. परंतु, यंदा कोरोनाची भीती नाही. मात्र, वारीमध्ये येणार्या वारकर्यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सूचना येणे आवश्यक आहे. यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली नाही. मात्र, आरोग्य विभागाकडून येणार्या सूचनांचे सर्वांना पालन करावे लागणार आहे,' असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
इंद्रायणी नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात असून ती काढण्यात यावी, अशी मागणी बैठकीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील यांनी केली. त्यावर हा राज्यस्तरीय विषय आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ती काढण्यासाठी नियोजन केले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
'आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून देहू, आळंदी आणि पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकर्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असतो. त्यामुळे या महिलांच्या वैयक्तिक स्वच्छता व सुरक्षेची तयारी करा,' असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मिशन असणे आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. महिला सुरक्षिततेकरिता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी, मंदिर परिसरात दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
https://youtu.be/m5yyfqkYqY4