मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीने केलेले राजकारण पाहता त्यांनी संभाजीराजे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला.
ते म्हणाले, आधी शरद पवार यांनी संभाजीराजे यांच्या उमेदवारीचा विषय सुरू केला. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते पाहता महाविकास आघाडीने यातून मोठे राजकारण केल्याचे दिसते. संभाजीराजे यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न यातून दिसतो, असे फडणवीस म्हणाले. महागाईवरूनही फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, पेट्रोल, डिझेलवर राज्याचा कर 29 रुपये आणि केंद्राचा कर 19 रुपये आहे. सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचे काम हे महाविकास आघाडीने केले. 29 रुपयांचा कर पेट्रोल, डिझेलवर लावून एक रुपयाही कमी न करता हे लोक महागाईवर कसे बोलू शकतात, असा सवाल फडणवीस यांनी केला.