वाल्हे : पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील झेंडेवाडी ते पिसुर्टी फाटा (ता. पुरंदर) दरम्यान रस्त्यालगतच झेंडेवाडी, काळेवाडी, ढुमेवाडी, पवारवाडी, सासवड, खळद, वाळुंज, शिवरी, निळुंज, तक्रारवाडी, साकुर्डे फाटा, बेलसर फाटा, जेजुरी, कोळविहिरे, दौंडज, वाल्हे, पिसुर्टी, शिवरी, निळुंज आदी गावे व त्यांच्या वाड्या-वस्त्या आहेत.
येथील गावातील नागरिकांना घरातून बाहेर पडल्यावर थेट रस्त्यावर यावे लागत आहे. अशावेळी या रस्त्याच्या दुतर्फा विद्युतीकरण व्हावे, तसेच उड्डाणपुलावरील व भुयारी मार्गातील विद्युत दिवे सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नागरिक आणि प्रवाशांनी केली आहे.
याबाबत गावांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र,अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. आता रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. रस्ता हस्तांतरित झाला तर पुन्हा हे काम होणार नाही. त्यामुळे येथील नागरिक अस्वस्थ झाले आहेत. हा रस्ता हस्तांतरित होण्यापूर्वीच विद्युतीकरण होणे गरजेचे आहे.
या रस्त्यालगत शाळा, महाविद्यालय, पेट्रोल पंप, मंगल कार्यालये, हॉटेल, औद्योगिक वसाहत, छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरी, शिवरी निवासी यमाईदेवी, वीर म्हस्कोबा मंदिर, आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी संजीवनी समाधी मंदिर, श्रीक्षेत्र मोरगाव येथे अनेक भाविक या रस्त्याने प्रवास करतात. या मार्गावर रात्रीच्या वेळेस अपघात होत आहेत. महामार्गावरील विद्युतीकरण नसल्यामुळे हे अपघात होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
पालखी महामार्गावरील पुरंदर तालुक्यातील जवळपास सर्वच उड्डाणपुलांचे काम होत असताना उड्डाणपुलाखाली तसेच मध्यभागी कोणतीही विद्युतीकरणाची तरतूद नसल्याने येथे रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधार होत आहे. अंधारात प्रवाशांना असुरक्षित वाटत आहे.
पालखी मार्गावर लावण्यात आलेले विद्युत दिव्यांचे सर्व काम पूर्ण झाले असून, त्यांचे टेस्टिंग करण्यात आले आहे. पुढील तीन-चार दिवसांत हे विद्युत दिवे सुरू करण्यात येतील.राजेंद्र ढगे, प्रकल्प अधिकारी