दत्ता भालेराव
भामा आसखेड : खेड तालुक्यातील पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. या गटातून सलग तीनदा शरद बुट्टे पाटील निवडूण गेले. भाजपचे जिल्हाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. या गटात त्यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील या भाजपकडून लढणार आहेत. ही निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी होण्याची शक्यता आहे.(Latest Pune News)
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण झाल्याने शरद बुट्टे पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली होती. परंतु, आरक्षणात हा गट महिलांसाठी राखीव झाला. त्यामुळे पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसल्याने त्यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांना रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे.
पाईट आंबेठाण या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांकडून माजी सभापती कैलास लिंभोरे यांच्या पत्नी व आसखेड खुर्द गावच्या माजी सरपंच प्राची लिंभोरे, शिवसेने (उबाठा) कडून पंचायत समिती व बाजार समितीच्या माजी संचालिका रत्नमाला गाळव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील यांच्या सून राजमाला बुट्टे पाटील यांची नावे चर्चेत आहेत. यामुळे या गटात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.
रत्नमाला गाळव या भागातून पंचायत समिती सदस्या झाल्या होत्या. एकदा बाजार समितीच्या सदस्या होत्या. त्यांचे पती कैलास गाळव हे बाजार समितीचे उपसभापती होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला रामराम करीत नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीने मागील पंचवार्षिक काळात चास कडूस गटातून निवडणूक लढविली होती. या वेळी त्या शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
राजमाला बुट्टे पाटील या माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील यांच्या सून व खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुटे पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. त्यामुळे बुट्टे पाटील विरुद्ध बुट्टे पाटील असा सामना या गटात होईल का, अशी चर्चा आहे.
या गटात भामाआसखेड धरण आहे. या गटातील आंबेठाण हा पंचायत समितीच्या गणात एमआयडीसीचा काही भाग येतो. त्यात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. कचरा समस्या, ड्रेनेज लाईन, वाहतूक कोंडी, कामगारांची सुरक्षितता आदी प्रश्न या गणात आहेत.
पाईट पंचायत समिती हा गण भात शेतीचा भाग आहे. एकीकडे एमआयडीसी तर दुसरीकडे शेती असा हा गट या गटात होणारी निवडणूक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.