कृषी परिषदेच्या बैठकीत विविध विकास कामांच्या 41 कोटींच्या खर्चास मान्यता
बदनापूर (जि.जालना) येथील तूर कृषी संशोधन केंद्राचाही होणार कायापालट
कृषी मंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब
पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगांव ऊस संशोधन केंद्राच्या (ता.फलटण,जि.सातारा) येथील बायो टेक्नॉलॉजी लॅबसह शेतकरी प्रशिक्षण केंद्र-अतिथी गृह, प्रशासकीय इमारत आणि कर्मचारी निवासस्थानांचे कामास सुमारे 40 कोटी 91 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाल्याने लवकरच हे केंद्र कात टाकण्याची अपेक्षा आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.2) येथे झालेल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत या बाबत विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या अधीन राहून कृषी परिषदेने मान्यता दिली आणि निधीसाठी शासनास शिफारस करण्यात आली आहे.
शिवाय या शिवाय बदनापूर (जि.जालना) येथील तूर कृषी संशोधन केंद्राच्या प्रयोगशाळा इमारत, शेतकरी प्रशिक्षण व निवास व्यवस्था, दाळ संशोधन संग्रहालय, प्रयोगशाळेसाठी उपकरणे, हवामान वेधशाळा, प्रक्षेत्रावर सूक्ष्म सिंचन पध्दती, शेततळी आदी विकास कामांच्या 14.31 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आल्यामुळे या केंद्राचाही कायापालट होण्याची अपेक्षा आहे. कृषी परिषदेच्या संचालक मंडळ बैठकीस कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, कृषी परिषदेचे शिक्षण संचालक यशवंत साळे, विस्तार संचालक धीरजकुमार कदम, संशोधन संचालक किशोर शिंदे, प्रशासनचे सह संचालक डॉ. वैभाव शिंदे यांच्यासह परिषदेचे संचालक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
* बंगलोरच्या युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रि सायन्सला चारही कृषी विद्यापीठातील संबंधितांनी भेटी दयाव्यात आणि तेथील शेतीसाठी चांगल्या ज्ञानाचा वापर विद्यापीठात सुरु करावा.
* राजगुरुनगर येथील एका खासगी शेतकर्यांनी बांधलेल्या कांदा चाळीची पाहणी स्वतः कृषीमंत्र्यांनी केली आहे. त्या नुसार कांदा चाळीच्या मूळ प्रस्तावांपेक्षा कमी खर्चात दर्जेदार कांदा चाळ उभारणीबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
* शेततळ्यांच्या उभारणीचा खर्च कमी ठेवून दर्जेदार कामावर भर दयावा.
* कृषी परिषदेची दर महिन्याला बैठक घेण्याचाही निर्णय.
* जगात सर्वत्र कृत्रिम बुध्दिमत्तेचा (एआय) वापर होत असताना कृषी विद्यापीठांनी मागे राहू नये. त्यासाठी काय करता येईल यावर सादरीकरण देण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या.
* परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या केळी ऊती संवर्धित केंद्राची क्षमता बांधणी वार्षिक एक लाख केळी रोपांवरुन दोन लाख करण्यासही मंजूरी देण्यात आली.
* कृषी परिषदांमधील विविध पदांचे अतिरिक्त पदभार कृषीमंत्र्यांच्या परवानगीने दिले जाणार.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कामासाठी आणि आवश्यकतेनुसार शासन निश्चित निधी उपलब्धता करेल. मात्र, विद्यापीठांमधील कोणतेही काम हे उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्णच असले पाहिजे, यावर माझा कटाक्ष राहील. त्यामध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याची स्पष्ट भुमिका कृषीमंत्र्यांनी मांडल्याची माहिती बैठकीनंतर अधिकार्यांनी दिली.