ओतूरच्या आदिवासी भागात भातलावणीला वेग Pudhari
पुणे

Rice Cultivation: ओतूरच्या आदिवासी भागात भातलावणीला वेग

पावसाचा लहरीपणा आव्हाने कायम

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: ओतूरच्या उत्तरेकडील आदिवासी भागात भात हे एकमेव पावसावर अवलंबून असलेले पीक घेतले जाते. या भागात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. खाचरांमध्ये पाणी भरल्याने भातलागवडीच्या कामांमध्ये आदिवासी बांधव व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी, काठेवाडी, कुडाळवाडी, माळेवाडी आदी गावांत सध्या भातलागवडीला वेग आला आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने इंद्रायणी, आंबेमोहर, दप्तरी, पूनम, या भाताची प्रामुख्याने लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. (Latest Pune News)

भातशेती हा आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. मात्र, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे भातपेरणी आणि लागवडीला मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. यंदा सुरुवातीला जास्त, तर नंतर कमी पाऊस पडला. पावसाच्या या लहरीपणाचा या शेतकर्‍यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

रोपांचा तुटवडा

महिनाभरापूर्वी आदिवासी बांधवांनी गावागावांत ग्रामदैवताच्या पांढरीची पूजा करून शेतीकामांना सुरुवात केली. मात्र, पेरणीवेळी वरचा दाणा न उतरल्याने भातरोपे विरळ झाली. त्यामुळे आता लागवडीसाठी रोपांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. परिणामी, काही भातखाचरे ओसाड राहण्याची भीती आहे, तर काही शेतकरी गर्‍या जातीच्या रोपांच्या लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञान

दरम्यान, आदिवासी भागात एकूण 19 हजार 400 हेक्टर भातक्षेत्र असून, 13 हजार 950 हेक्टर वर भाताची लागवड करण्यात आली आहे. या जमिनीवर येथील शेतकरी वर्षानुवर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शेती कसत आले आहेत. मात्र, बदलत्या काळात वेळोवेळी मिळत असणारे मार्गदर्शन आणि सुविधांमुळे आता बदल होताना दिसू लागला आहे. पारंपरिक बैलांच्या कुळवाऐवजी ट्रॅक्टर आणि रोटरद्वारे चिखल तयार केला जात आहे.

पावसाने वाढवली चिंता

मुसळधार पावसामुळे भातरोपे विरळ झाली, तर काही ठिकाणी पाणी साचल्याने रोपे कुजून गेली. रोहिणी, आर्द्र आणि थोरला पुनर्वसू या नक्षत्रांमध्ये पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे भातलागवडीचा प्रश्न निर्माण झाला होता. धाकटा पुनर्वसू नक्षत्र पावसाने उसंत घेतल्याने लागवडी रखडल्या, तर काही शेतकर्‍यांनी विहीर, तळी आणि बंधार्‍यांतून पाणी उपसून लागवड केली. पाऊस सुरू झाल्याने भातलागवडीला वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT