खडकवासला: खडकवासला धरणसाखळीत चारही धरणक्षेत्रांत तुरळक पावसाचा अपवाद वगळता पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे खडकवासलातील मुठा पात्रातील विसर्ग 1 हजार 670 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. दरम्यान, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासला धरणाचे पाच दरवाजे उघडे ठेवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.
धरणसाखळीत शनिवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजता 25.64 टीएमसी (87.97 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला; तरी पानशेत, वरसगाव, टेमघर खोर्यात पावसाळी वातावरण कायम आहे. (Latest Pune News)
ओढ्या-नाल्यांतून पाण्याची आवक सुरू असल्याने पानशेत व वरसगावमधून प्रत्येकी 600 आणि टेमघर धरणातून 300 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. शनिवारी टेमघर येथे 3, वरसगाव 3 आणि पानशेत येथे 3 मिलिमीटर पाऊस पडला. तर खडकवासला येथे पावसाची नोंद झाली नाही.
धरणक्षेत्रात तुरळक पाऊस आहे. खडकवासलात पाण्याची आवकही कमी झाली आहे. मात्र, वरील तिन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे खडकवासलात पाण्याची भर पडत आहे. आता पाणीपातळी 60 टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी खडकवासला धरणाचे 11 पैकी 5 दरवाजे उघडे ठेवण्यात येणार आहेत. सध्या पाच दरवाजांतून मुठा नदीत पाणी सोडले जात आहे.
-गिरिजा कल्याणकर-फुटाणे, शाखा अभियंता, खडकवासला धरण विभाग