MLA Pathare slams absent officials in mohalla meeting
येरवडा: मोहल्ला कमिटीच्या बैठकीत नागरिकांच्या समस्या सुटत नसतील, तर फक्त सह्या घ्या, चहा प्या, मीटिंग तरी कशासाठी घेता? असा संतप्त सवाल आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपस्थित केला. नागरिक विविध समस्या घेऊन या बैठकीला येतात. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारीच बैठकीला उपस्थित राहत नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटीच्या बैठकीचे नुकतेच आयोजन केले होते. या बैठकीला काही विभागांचे अधिकारी उपस्थित नसल्याने आ. पठारे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. (Latest Pune News)
ते म्हणाले की, नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याला मोहल्ला कमिटीच्या बैठकीचे आयोजन केले जाते. या बैठकीला सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित असतील, तर नागरिकांच्या समस्यांवर चर्चा होऊन त्यांचे निराकरण होईल. मात्र, अधिकारीच जर उपस्थितनसतील, तर नागरिकांच्या समस्या सुटणार तरी कशा?
या बैठकीला अनुपस्थित असलेल्या अधिकार्यांवर प्रशासनाने कारवाई करावी तसेच अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असतील, तर बैठकीचे आयोजन करा,अशा सूचनाही आ. पठारे यांनी प्रशासनाला दिल्या.
बैठक सुरू असताना काही अधिकारी मोबाईलमध्ये रमल्याचे दिसून आले. ही बाब मोहल्ला कमिटीच्या सदस्यांनी वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास आणूदेत प्रशासन नागरिकांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याची भावना व्यक्त केली.