वेल्हे: राजगड तालुक्यातील पाबे घाटात रविवारी (२८ जून) पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास बसचा भीषण अपघात झाला. पाबे बाजूला असलेल्या शेवटच्या वळणावर चालकाला अंदाज न आल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला कोसळली. या अपघातात ध्वनी चंद्रेश ठक्कर वय (२३) विश्वास बाबूराव सातिम वय (२५) सर्व राहणार मुंबई या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चालकासह १९ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अंधेरी मुंबई येथील एका खासगी कंपनीतील कर्मचारी राजगड किल्ल्यावर ट्रेकसाठी निघाले होते. पाबे घाटातून प्रवास करत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनचे आकाश पाटील, पंकज मोघे व त्यांचे इतर सहकारी, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ,संदीप सोळसकर , कृष्णा मरगळे तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने बस दरीतून बाहेर काढण्यात आली तसेच अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून रुग्णवाहिकांद्वारे वेल्हे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
यावेळी वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोईटे यांनी सांगितले की यातील २ जण मयत झाले असून, १९ जखमी झाले आहेत. अपघातामुळे परिसरात काही काळ जखमींवर उपचार सुरू आहे.
राजगड तालुक्यातील घाट रस्त्यांची सुरक्षितता धोक्यात
राजगड तालुक्यातील पाबे , घाट, कादवे घाट, तसेच परिसरातील धोकादायक वळणावर संरक्षित कठडे बसविण्यासाठी निधी मंजूर असूनही ही ठेकेदार काम करत नाहीत. यामुळे या रस्त्यांची सुरक्षितता धोक्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.