पुणे

महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा : खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थांचा संताप

Laxman Dhenge

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा सबस्टेशनच्या अखत्यारीत येणार्‍या चिंचणी, धुमाळवाडी, निर्वी ग्रामस्थांनी केडगाव कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. यासंबंधीचे निवेदन केडगाव महावितरण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना देण्यात आले आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपतालुकाप्रमुख अनिल पवार, माजी सरपंच बाळासाहेब पवार, बापुराव पवार, माजी उपसरपंच मोहन पवार, गोरख पवार, गजानन जगताप, भरत पवार, जितेंद्र जेउघाले, सुदाम जेउघाले, पप्पू चौधरी, संतोष धावडे आदी मोर्चात सहभागी होते.

शिरसगाव काटा सबस्टेशनमधून चिंचणी, धुमाळवाडी, निर्वी गावास होणारा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. पाणी विहिरीतून वीजपंपाने शेतात येईपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच या गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यातही शेतकर्‍यांना रात्रपाळीमध्ये जीव मुठीत धरून पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. परंतु शेतात कांद्याचे चार सारे पूर्ण होण्याआधीच वीज गायब होत आहे. दुसरीकडे या भागातील साखर कारखाना शासनाच्या पक्षपाती धोरणामुळे यंदा बंद पडला असून शेतकर्‍यांना ऊस घालण्यासाठी पराकाष्ठा करावी लागत आहे. ऊस उशिरा जात असल्याने कांदा व गव्हाची लागवड उशिरा झाली आहे. त्यातच विजेचा लपंडाव होत असल्याने जगावे की मरावे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. येत्या 8 दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करावा, असे निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT