पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत कमी जागांवर विजय मिळाला असला तरी विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी मतदान घेऊन आमचे आमदार निवडून आले आहेत. अलीकडच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागात राष्ट्रवादीने सत्तेच्या माध्यमातून अनेक कामे केले आहेत. या बळावर आमचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहज जिंकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा 26 वर्धापनदिन बालेवाडी येथे संपन्न होत असून येथील कार्यक्रम स्थळाच्या पाहणीनंतर ते बोलत होते. (Latest Pune News)
तटकरे म्हणाले, बालेवाडीच्या कार्यक्रमस्थळी सुमारे पंचवीस हजार कार्यकर्ते बसतील, अशी बैठक व्यवस्था केली आहे. भव्य व्यासपीठावर प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार आणि विविध फ्रंटल आणि सेलचे प्रदेशाध्यक्ष यांची आसन व्यवस्था केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतरचा पक्षाचा हा सर्वात मोठा आणि पहिला कार्यक्रम असल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याला हजारो कार्यकर्त्यांसह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पक्षाच्या एकजुटीचे आणि महाराष्ट्रातील प्रभावाचे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.
महायुतीत आम्ही या सर्व निवडणुका एकत्र लढणार आहोत. काही जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या ठिकाणी अपवाद म्हणून स्वतंत्र ही निवडणुका लढवल्या जाऊ शकतात. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकांमध्ये हमखास विजय मिळेल, असे मुद्दे आमच्या विरोधकांकडे नाहीत.
तसेच लोकविकासाचा अजेंडा ही त्यांच्याजवळ नाही, अशी टीका तटकरे यांनी केली. कार्यक्रम स्थळाची पाहणी करताना तटकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सरचिटणीस लतीफ तांबोळी, प्रवक्ते संजय तटकरे, कोषध्यक्ष संजय बोरगे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते.