Rural Life Summer Struggle Pudhari
पुणे

Maharashtra Rural Life Summer Struggle: ओतूरची दुपार: उन्हाच्या झळांमध्ये जगण्याचा संघर्ष आणि वाट पाहणाऱ्या डोळ्यांची कहाणी

उत्तर पुण्यातील गावखेड्यांमध्ये उन्हाळा म्हणजे केवळ तापमान नव्हे, तर माणुसकीचा जिवंत अनुभव

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: उत्तर पुणे जिल्ह्यातील गावखेड्यातील उन्हाळा म्हणजे फक्त तापमानाचा आकडा नसतो, तर तो असतो जगण्याचा संघर्ष, घामाचा इतिहास आणि उंबरठ्यावर बसून माणसांची वाट पाहणाऱ्या वृद्ध डोळ्यांची वेदना. जगण्याचा संघर्ष आणि लेकरांच्या प्रतीक्षेची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी येथे दरवर्षीचीच झाली आहे.

डोंगरकुशीला विसावलेल्या अनेक खेड्यांमध्ये दुपारचे ऊन जणू आगीचे लोळ बनून अंगावर कोसळत असते. गावातील धडधाकट पुरुष आणि बाया पोटासाठी शेतात, मजुरीवर किंवा सरकारी कामांवर गेलेली असतात; तर घरात उरतात त्या फक्त वयाने थकलेल्या; पण मनाने अजूनही कणखर असलेल्या म्हाताऱ्या माणसांच्या सावल्या. कुडाच्या अथवा जोत्याच्या घरात दुपारच्या उन्हाने जिवाची अक्षरशः काहिली होत असते.

उंबरठ्यावर बसलेली वृद्ध माणसं दिवसभर कामावर गेलेल्या लेकरांची वाट पाहत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे, हातावर हिरवे गोंदण, ओठांवर मशेरीची काळी छटा आणि पायांवर भेगांचे वण; पण तरीही त्यांच्या डोळ्यातं जगण्याची एक हट्टी चमक दिसून येते. कामावर गेलेल्या आईबरोबर तान्ही लेकरं जातात; तर थोडी मोठी चिलीपिली वाडीतच खेळत राहतात. त्यांच्याभोवती वृद्धांचे प्रेमाचे कवच असते.

दुपारच्या शांततेत फक्त वाऱ्याचा आवाज, दुरून ऐकू येणारे पक्ष्यांचे स्वर आणि कधीमधी गारेगार विकणाऱ्या भैयाभोवती जमलेल्या मुलांचा गलका, एवढेच जिवंतपणाचे चिन्ह असते. दुपारचा तळपता सूर्य हळूहळू कलू लागतो, सावल्या तिरक्या होतात आणि पक्ष्यांच्या गलबल्याने गावाला पुन्हा जिवंतपणा येऊ लागतो. चुली पेटतात, पितळी पातेल्यात चहाचे आंधण चढते आणि दिवसभर उन्हाशी झुंज देऊन परतलेली माणसं घरात शिरतात. त्या क्षणी उंबरठ्यावर वाट पाहणाऱ्या म्हाताऱ्या डोळ्यांत पुन्हा समाधान फुलते.

नात्यांची ऊब अन्‌‍ सावलीची साथ

  • वाडीतल्या देवळाजवळील लिंब, पिंपळाच्या सावलीत बसून अनेक वृद्ध मंडळी गळणारी पानं न्याहाळत वेळ घालवत असतात.

  • देवळाच्या गाभाऱ्यात सकाळी लावलेल्या उदबत्तीचा मातकट सुगंध बाहेर दरवळत राहतो. एखादा वाटसरू तो वास घेत देवळाबाहेरच हात जोडून पुढे निघून जातो.

  • ही दुपार केवळ ऋतू नसून माणुसकीची एक जळती कहाणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT