ओतूर : उत्तर पुणे जिल्ह्यात माळशेज पट्यातील ओतूर व आजूबाजूच्या गावांमध्ये गेले काही दिवसांपासून सातत्याने हवामान बदलत आहे. कधी थंडी तर कधी दमट तसेच कधी धुके तर कधी पाऊस या बदलत्या हवामानामुळे येथील प्रमुख पीक कांद्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
त्यामुळे कांद्यावर भुरी, करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांना लागवड केलेल्या कांद्याला सुरुवातीपासूनच महागड्या फवारण्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे आपसूकच शेतकऱ्याच्या खिशाला कात्री लागून बदलत्या हवामानाचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
ओतूर आणि परिसरातील सुमारे 50 गावांमध्ये दरवर्षी दर्जेदार कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. मुबलक पाणी, सुपीक जमीन व पोषक हवामान यामुळे येथील शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल दिसून येतो. एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येणाऱ्या कांदा पिकाची लागवड या परिसरात अंतिम टप्प्यात आली आहे, तसेच अद्यापही या भागात कांदा लागवडी सुरूच असून गत काळात पार पडलेल्या लागवडीवर बदलत्या हवामानाचा व विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.
कांदा लागवडीसाठी सध्या मजुरीला भलताच भाव आला असून सुमारे 1 हजार रुपये इतकी मजुरी शेतकऱ्यांना प्रत्येक मजुराला मोजावी लागत आहे. भविष्यात कांद्याला बाजारभाव मिळतीलच अशी कोणतीही शाश्वती नसताना कांदा लागवडीसाठी शेतकरी जीवाचे रान करीत आहेत. अद्यापही गेल्या वर्षीचा कांदा बाजारभावाअभावी चाळीत सडत पडला आहे. तरीही येथील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीची हिंमत दाखविली आहे.
नाशिकचा कांदा हा अगाप कांदा म्हणून सर्वश्रुत आहे, तो कांदा जर बाजारात विक्रीसाठी आला तर पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये जुना कांदा विक्रीस आणू नये, असा सूचना फलक आवर्जून लावला जात असतो. अद्यापही गेल्या वर्षीचा जुना कांदा चाळीत असल्यामुळे व नवीन कांद्याची लागवड सुरू असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतीत झाला आहे.