पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील मिळकतधारकांसाठी 30 जूनपर्यंत मिळकतकराच्या बिलात विविध सवलती आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे 4 दिवस बाकी आहेत. बिल न भरल्यास 1 जुलैपासून मिळकत जप्तीचा धडाका सुरू करण्यात येणार आहे, असा इशारा महापालिकेने दिला आहे. तीस जूनपर्यंत संपूर्ण मिळकतकराचा भरणा केल्यास किमान 10 टक्के व कमाल 20 टक्के सवलत मिळत आहे. त्यानुसार, आतापर्यंत 2 लाख 52 हजार 296 मिळकतधारकांनी बिलाचा भरणा करून सवलतींचा लाभ घेतला आहे.
बिलापोटी तब्बल 334 कोटी रुपये जमा झाले आहेत. शहरात 31 मार्च 2023 अखेर 50 हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणार्या 39 हजार 655 मिळकती आहेत. त्यांच्याकडे तब्बल 650 कोटी थकबाकी आहे. कर वसूल करण्यासाठी एसएमएस, कॉलिंग, रिक्षाव्दारे जनजागृती, होर्डिंग व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
एक जुलैपासून जप्तीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जप्तीसाठी एमएसएफ जवान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन ते तीन झोन मिळून एक जप्ती पथक तयार केले आहे. येत्या तीन महिन्यांत सर्व जप्तीपात्र मिळकतींवर कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
असे जमा झाले 334 कोटी
ऑनलाईन- 231 कोटी 8 लाख
विविध अॅप- 3 कोटी 79 लाख
रोख- 42 कोटी 53 लाख
धनादेश- 27 कोटी 97 लाख
ईडीसी- 3 कोटी 52 लाख
आरटीजीएस- 10 कोटी 44 लाख
मिळकतकर न भरल्यास महिना 2 टक्के विलंबशुल्क आकारण्यात येते. विलंबशुल्क प्रत्येक दिवशी वाढत राहते. त्यामुळे कराची थकबाकी ठेवणे हे मिळकतधारकांसाठी आर्थिक नुकसानीचे आहे. थकबाकीदारांनी याचा विचार करून थकीत कर भरावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
हेही वाचा
पुणेकरांनो सावधान ! स्वस्तातले गॅजेट्स पडतील महागात; बनावट बिल देऊन मोबाईल विक्री करणारी टोळी सक्रिय