पुणे : युध्द तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भारताने केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले. त्यामुळे यापुढच्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी सैनिकांचे आत्मबल वाढले आहे. मात्र, 1962 मध्ये चीनसोबत युध्द झाले तेव्हा प्रतिकूल परिस्थिती होती. अशावेळी दिवंगत ले. जन. थोरात यांसारख्या महान योद्ध्यांनी मोठे योगदान दिले, असे मत देशाचे संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) जन. अनिल चौहान यांनी व्यक्त केले.(Latest Pune News)
कोल्हापूर येथील दिवंगत लष्करी अधिकारी ले. जन. एसपीपी थोरात यांनी लिहिलेल्या ‘फ्रॉम रेव्हेल्ट टू रिट्रीट’ या आत्मचरित्राचे पुनर्प्रकाशन बुधवारी दुपारी 4 वाजता पुण्यातील दक्षिण कमांड मुख्यालय परिसरातील संजोग हॉलमध्ये झाले.
या वेळी संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी दिल्लीतून दूरस्थ पद्धतीने (ऑनलाइन) संवाद साधला. या वेळी व्यासपीठावर दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जन. धीरज सेठ, दिवंगत ले. जन. थोरात यांचे पुत्र डॉ. यशवंत थोरात, स्नूषा उषा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी लष्कराच्या तीनही दलांतील आजी-माजी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर येथून पुण्यात स्थायिक झालेले थोरात कुटुंबीयांचे स्नेही मोठ्या संख्येने आले होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रेक्षकांत बसून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आभारप्रदर्शन सेवानिवृत्त ॲडमिरल मोहन रामन यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
थोरात यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख
या वेळी दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जन. धीरज सेठ यांनी देखील दिवंगत ले. जन. थोरात यांच्या कार्याचा गौरवपूर्व उल्लेख केला. दुसरे महायुद्ध 1962 मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धातील थोरात यांच्या महत्त्वपूर्ण सहभागाचे अनेक पैलू त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. यशवंत थोरात यांनी केले. या वेळी लष्करी अधिकारी शिवकुणाल वर्मा यांनी थोरात कुटुंबासोबत कारगिल युद्ध संपताच कशी ओळख झाली ते सांगितले.
तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते
या वेळी संरक्षण दलप्रमुख जन. चौहान यांनी दिल्लीतून दूरस्थ पद्धतीने भाषण केले. ते म्हणाले की, दिवंगत ले. जन. थोरात यांचे योगदान भारतीय लष्कराच्या इतिहासात फार महत्त्वाचे आहे. त्यांचे आत्मचरित्र म्हणजे संघर्ष, प्रेरणा आणि रोमांच, यांचा संगम आहे. पंजाब रेजिमेंटचे ते पहिले प्रमुख होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात 1945 मध्ये, तर 1962 मध्ये चीनसमवेत झालेल्या युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्या वेळी आपल्याकडे आजच्या इतके प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे लेफ्टनंट जनरल थोरातांचे योगदान मोठे आहे. आज आपण ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते केले, ते केवळ तंत्रज्ञानातील प्रगतीमुळेच.
ले. जन. थोरात यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून उषा थोरात, शिवकुणाल शर्मा, ले. जन. धीरज सेठ, डॉ. यशवंत थोरात आदी.