पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आणि भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक विमानतळांवरील उड्डाण सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि. 8) पुणे विमानतळावर किमान 13 उड्डाणे रद्द करण्यात आली. रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये इंडिगो आणि स्पाइसजेट या विमानसेवा कंपन्यांचा समावेश होता. यामुळे अमृतसर, कोची, हैदराबाद, जयपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांशी असलेली देशांतर्गत हवाई संपर्क व्यवस्था प्रभावित झाली.
विमानतळ प्रशासनाने सांगितले की सर्व प्रभावित प्रवाशांना विमान कंपन्यांकडून थेट संपर्क, डिजिटल अलर्ट्स आणि सार्वजनिक घोषणा यांसारख्या विविध माध्यमांतून माहिती देण्यात आली आहे.
‘डीजीसीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आमच्या ग्राउंड टीम्सनी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी समन्वय साधत योग्य ती कार्यवाही केली. प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा त्यांच्या सोयीप्रमाणे पुन्हा उड्डाणाचे वेळापत्रक देण्यात आले आहे,’ असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अमृतसर : पुणे (6E 6129)
पुणे : कोचीन (6E 6129)
चंदीगड : पुणे (6E 681)
पुणे : हैदराबाद (6E 336)
राजकोट (हिरासर) : पुणे (6E 957)
पुणे : जोधपूर (6E 133)
पुणे : चंदीगड (6E 242)
पुणे : अमृतसर (6E 721)
पुणे : राजकोट (हिरासर) (6E 956)
पुणे : सूरत (6E 6191)
जोधपूर : पुणे (6E 414)
पुणे : भावनगर (SG 1077)
पुणे : जयपूर (SG 1080)
भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील शहरांवर 'एअर स्ट्राइक' केल्यानंतर देशातील अनेक महत्त्वाचे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर काही महत्त्वाच्या शहरांमधील विमानतळावरील हवाई वाहतूक बाधित झाली आहे. यात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे. बुधवारी पुणे विमानतळावरून पाच शहरांसाठीची विमानसेवा रद्द करण्यात आली होती.