पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जनासाठी महापालिकेने व्यवस्था केलेल्या फिरत्या विसर्जन हौदांमध्ये यंदाही केवळ 10 टक्के मूर्तींचे विसर्जन झाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला बिल देताना विसर्जन झालेल्या मूर्तींच्या संख्येची पडताळणी करावी, तसेच पुढील वर्षी हा वायफळ खर्च केला जाऊ नये, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून केली जात आहे. कोरोनाकाळातील निर्बंध लक्षात घेत महापालिका प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी फिरत्या हौदाची संकल्पना राबविली होती. त्या वेळी त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे निर्बंध काढल्यानंतर महापालिकेने आपली पूर्वीची विसर्जन व्यवस्था कार्यान्वित केली. त्यामुळे कोरोना काळात सुरू केलेल्या फिरत्या विसर्जन हौदांची गरज नाही. त्यामुळे ते बंद करावेत, अशी मागणी होत असतानाही गेल्या वर्षी फिरत्या विसर्जन हौदाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
गेल्या वर्षी विसर्जित झालेल्या एकूण मूर्तींपैकी केवळ 13 टक्के मूर्तींचे विसर्जन फिरत्या हौदात झाले. फिरत्या हौदांना नागरिकांकडून कमी प्रतिसाद कमी मिळत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने यंदाच्या गणेशोत्सवात फिरते हौद नसतील, असे जाहीर केले होते. त्यानंतर युटर्न घेत 150 फिरत्या विसर्जन हौदांसाठी निविदा काढण्यात आली. यावरून प्रशासनावर टीका झाली होती. मात्र, गणेश मंडळांनी मागणी केल्यानेच ही सुविधा उपलब्ध करून देत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला.
यंदा 5 लाख 61 हजार 428 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी 59 हजार 126 गणेशमूर्तींचे विसर्जन हे फिरत्या विसर्जन हौदात झाले. हे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमी म्हणजे केवळ 10 टक्के असल्याचा आरोप सजग नागरिक मंचने केला आहे. प्रशासनाने अट्टाहासाने या हौदांसाठी दीड कोटी रुपयांची निविदा काढली; परंतु नागरिकांनी त्यास प्रतिसाद दिला नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तसेच या ठेकेदाराला बिलाचे पैसे देताना गणेशमूर्तींच्या संख्येची पडताळणी करावी, तसेच पुढील वर्षी अशा प्रकारचा वायफळ खर्च करू नये, अशी मागणी मंचचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.
हेही वाचा