पुणे

ट्रस्टना अंदाजपत्रक सादरीकरणासाठी आता उरले आठच दिवस

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

धर्मादाय नियम 1951 मधील नियम 16 अ प्रमाणे ज्या धार्मिक ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तसेच ज्या इतर धर्मादाय संस्थांचे उत्पन्न दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना अंदाजपत्रक सादर करावे लागणार आहे. हे अंदाजपत्रक सादर करण्यास आता केवळ आठ दिवस उरले आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा 1950 चे कलम 31 अ नुसार सर्व नोंदणीकृत ट्रस्ट व धर्मादाय संस्थांनी पुढील आर्थिक वर्षाचे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक सादर करणे आवश्यक आहे. या अंदाजपत्रकात संपूर्ण आर्थिक वर्षात संस्थेच्या मालमत्तेत होणारी वाढ अथवा विक्रीद्वारे येणारी रक्कम, उद्दिष्टनिहाय, तसेच प्रशासकीय खर्चासाठीची तरतूद, संस्थेचे काही विशेष उपक्रम सुरू होणार असतील तर त्यासाठीचे आर्थिक नियोजन, संस्थेची देणी, कर्जफेड आदीबाबतचे नियोजन याची माहिती देणे गरजेचे आहे.

ट्रस्टच्या नावे बँकेमधील मुदत ठेवी व त्यावर मिळणारे व्याज, इतर गुंतवणूक व त्यावरील परतावा, खासगी देणग्या, सीएसआर प्रकल्प, शासकीय अनुदान अशा सर्व उत्पन्न स्रोतांची माहिती अंदाजपत्रकात नमूद करावी लागते. यासोबत विद्यमान कालावधीत कार्यरत सर्व विश्वस्तांची नावे, तसेच त्यांनी पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मान्य केल्याचा ठराव सोबत जोडावा लागतो.

याबाबतची संपूर्ण माहिती विश्वस्त कायद्याच्या 'परिशिष्ट 7 अ'मध्ये छापील नमुन्यात भरून 28 फेब्रुवारीपूर्वी संबंधित धर्मादाय कार्यालयांच्या लेखा शाखेत जमा करून त्याची पोहोच घ्यावी लागते. सर्व ट्रस्ट व धर्मादाय संस्थांनी आपल्या चार्टर्ड अकाउंटंटशी संपर्क करून बजेट दाखल करण्याची वेळेत पूर्तता करणे आवश्यक आहे.

अंदाजपत्रक सादर केले नाही तर वार्षिक लेखापरीक्षण अहवालात (अ‍ॅाडिट) तशी नोंद केली जाते. अशी नोंद विश्वस्तांची अकार्यक्षमता म्हणून समजली जाऊ शकते.
                    – अ‍ॅड. शिवराज प्र. कदम, अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT