मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणार्या भाविकभक्तांना ऑनलाइन पास (क्यूआर कोड) सुविधा देण्याचा विचार देवस्थानकडून सुरू आहे. मात्र, ऑनलाइन पासला नेटवर्कचा खोडा असल्याने ऑनलाइन पास सुविधा सुरू करणे अवघड असल्याचे दिसून येते.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकभक्त, पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. श्रावण महिन्यात या ठिकाणी दररोज लाखो भाविक पर्यटन, दर्शनासाठी येत असतात. (Latest Pune News)
या ठिकाणी अनेकदा भाविकांकडून परस्पर पैसे घेऊन त्यांना दर्शन दिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने ऑनलाइन पासची सुविधा देण्याचा विचार करीत आहेत. मात्र, हा पास देताना नेटवर्कचा मोठा अडथळा निर्माण होत आहे.
या ठिकाणी बीएसएनएल, एअरटेल, आयडिया, जिओ कंपनीचे टॉवरद्वारे नेटवर्क आहे. परंतु, सततच्या पावसामुळे या ठिकाणी वारंवार वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर नेटवर्क अनेक दिवस बंद राहत आहे. संबंधित टॉवर कंपनीने त्याच्या नेटवर्कमध्ये सुधारणा करावी तसेच टॉवरच्या ठिकाणी इन्व्हर्टरची सुविधा, 24 तास ऑपरेटर नेमणे गरजेचे आहे; जेणेकरून येणार्या भाविकांना ऑनलाइन पास तत्काळ मिळेल व त्यांचे दर्शन सुलभ होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
येथील नेटवर्क सुधारा
24 तास नेटवर्क मिळाल्यास ऑनलाइन पद्धतीने पास तत्काळ मिळेल. येणार्या भाविकभक्तांना दर्शन घेताना अडचणी येणार नाहीत तसेच मंदिर व्यवस्थापन समितीच्या उत्पन्नात देखील वाढ होईल. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी त्यांचे नेटवर्क सुधारावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे आणि भाविकभक्त, मंदिर प्रशासनाकडून होत आहे.
भीमाशंकर परिसरात नेटवर्कसेवा देत असलेल्या संबंधित टॉवर कंपनीने सुरळीत नेटवर्क दिल्यास ऑनलाइन दर्शन सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे सद्य:स्थितीत 4 ते 5 तास दर्शनासाठी भाविकांना रांगेत थांबावे लागणार नाही.- रमेशशेठ येवले, अध्यक्ष संस्थापक, रमेशभाऊ येवले प्रतिष्ठान, गंगापूर
भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी ऑनलाइन पद्धतीने दर्शन करण्यासाठी देवस्थान प्रयत्नशील आहे. येथे लवकरच ऑनलाइन दर्शन सुविधा भाविकांना उपलब्ध केली जाईल. केवळ पावसामुळे मोबाईल टॉवरच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. भाविकांना ऑनलाइन पासद्वारे दर्शन देण्यासाठी कार्यवाही केली जाईल.- सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान