आळेफाटा: कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरू असल्याने शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी (दि. 29) झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या दहा किलो कांद्यास 171 रुपये कमाल भाव मिळाला. सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे यांनी ही माहिती दिली.
आळेफाटा उपबाजारात घसरलेल्या बाजारभावाचा चढ-उतार सुरूच आहे. उन्हाळ्यात कांद्यास योग्य भाव नसल्याने अनेक शेतकर्यांनी कांदा साठवणूक केली. कांद्यास चांगले भाव मिळतील, या अपेक्षेत असलेल्या शेतकरीवर्गाच्या पदरी मात्र घसरलेल्या भावामुळे निराशाच पडली. (Latest Pune News)
या भावात उत्पादनखर्च वसूल होत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. आळेफाटा उपबाजारात मागील दोन महिन्यांत प्रतिदहा किलोस दोनशेहून अधिक असलेले भाव सध्या दोनशे रुपयांखाली आले आहेत.
दरम्यान, पावसाचा फटका साठवणूक केलेल्या कांद्यास बसू लागल्याने शेतकरीवर्ग कांदा विक्रीस आणू लागले आहेत. यामुळे आवक वाढली आहे. आळेफाटा उपबाजारात 15 ऑगस्टपासून कांदा आवक वाढण्यास सुरुवात झाली.
गेल्या काही दिवसांतील आवक दहा हजार गोणींवर होत आहे. शुक्रवारी (दि. 29) झालेल्या लिलावात पुन्हा एकदा कांदाभावात घसरण झाली. शुक्रवारी 17 हजार 584 गोणी शेतकरीवर्गाने विक्रीस आणल्या होत्या, अशी माहिती संचालक नबाजी घाडगे, सचिव रूपेश कवडे, कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.