पुणे: श्री गणरायाच्या आगमनानंतर चैतन्यपूर्ण अन् आनंदी वातावरणात उद्या (दि. 31) गौरींचे घरोघरी आगमन होणार आहे. गौरींच्या आगमनानिमित्त बाजारपेठांमध्येही खरेदीची लगबग पाहायला मिळत असून, गौरींचे मुखवटे, मूर्ती, सजावटीचे साहित्य आणि पूजासाहित्याच्या खरेदीसाठी महिला-तरुणींची गर्दी होत आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसचे (पीओपी) आणि शाडू मातीचे गौरीच्या मुखवट्यांसह फायबरच्या मूर्तींची खरेदी केली जात आहे. मराठमोळी नथ ते मोत्यांची माळ, अशा दागिन्यांसह मुकुटापासून ते देखाव्यांच्या संकल्पनेप्रमाणे सजावटीचे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. साहित्य खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. (Latest Pune News)
बाप्पाच्या आगमनानंतर घरोघरी गौरींचे आगमन होणार असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण रंगले आहे. हा उत्साह बाजारपेठांमध्येही पाहायला मिळत आहे. गौरीपूजनासाठी लागणारे साहित्य, सजावटीचे साहित्य आणि नैवेद्यासाठीच्या लागणार्या खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये महिला-युवतींची लगबग पाहायला मिळत आहे.
मंडई, रविवार पेठेतील बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग परिसरात खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. शाडू, धातू, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) प्रकारातील गौरींच्या मुखवट्यांसह फायबरच्या मूर्तीही खरेदी केल्या जात आहेत. मराठमोळी नथ, मुकुट, मोत्यांचा हार, मंगळसूत्र, ठुशी, बांगड्या असे विविध प्रकारचे दागिने खरेदी केले जात आहेत.
खड्यांचे, मोत्यांचे, इमिटेशन ज्वेलरी, चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीला प्रतिसाद आहे. पैठणी ते नऊवारी साडीपर्यंत, विविध प्रकारच्या साड्यांचीही खरेदीसह सजावटीच्या साहित्यात विद्युतरोषणाईचे दिवे, फुले, रंगबिरंगी कागद, झिरमिळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे मखर आदी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. गौरीपूजनासाठी लागणारी पाने, तेरड्याची पाने, कमळ, वेणीसाठी लागणार्या फुलांची खरेदीहीहोत आहे.
गौरींचे मुखवटे आणि मूर्तीविषयी माहिती देताना नीलेश खुळे म्हणाले की, यंदा गौरीच्या मुखवट्यांना आणि मूर्तींना मागणी आहे. पीओपीच्या मुखवट्यांना सर्वाधिक मागणी आहे. फायबरच्या मूर्तीही खरेदी केल्या जात आहेत.
गौरीच्या मुखवट्यांची जोडी विकत घेतली जात आहे. साहित्य खरेदीला प्रतिसाद आहे. खरेदीसाठी आलेल्या अस्मिता जाधव म्हणाल्या, यंदा गौरींच्या आगमनानिमित्त सजावट केली आहे. शाडूच्या गौरी मुखवट्यांसह पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी केले.