आळेफाटा: पावसामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात कांदा आवक वाढली आहे. शुक्रवारी (दि. 30 मे) उच्चांकी अशी 34 हजार तर रविवारी (दि. 1) तब्बल 23 हजार कांदा पिशवीची आवक झाली. रविवारच्या लिलावात प्रति 10 किलोस 171 रुपये कमाल भाव मिळाल्याची माहिती सभापती संजय काळे आणि उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.
कांद्यास सरासरी कमी भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकरीवर्गाने कांदा चाळीत साठवला; मात्र काही शेतकऱ्यांचा कांदा शेतातच होता. मान्सूनपूर्व पाऊस सर्वत्र जोरदार पडला. शेतातील उन्हाळी कांद्यासह इतर पिकांचे यामुळे नुकसान झाले. (Latest Pune News)
कांद्याचे अधिक नुकसान होऊ नये यामुळे शेतकरीवर्ग कांदा बाजारात विक्रीस आणत असल्यानेच कांद्याची आवक अचानक वाढत आहे. कांद्याचे आवकेसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या आळेफाटा उपबाजारातही यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आळेफाटा उपबाजारात कांद्याचे भाव 100 रुपये प्रति 10 किलोपर्यंत मंगळवारी (दि. 27 मे) झालेल्या लिलावात होते. परंतु आवक वाढली अन् भावात काही प्रमाणात घसरण झाली. पावसामुळे कांदा सडेल या भीतीने शेतकरी कांदा विक्रीस आणत असल्याचे अडतदार व्यापारी संजय कुऱ्हाडे, विजय कुऱ्हाडे, अनिल गडगे, जीवन शिंदे, शिवप्रसाद गोळवा, ज्ञानेश्वर गाढवे यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि. 30 मे) 34 हजार 260 गोणी कांदा व रविवारी (दि. 1) 23 हजार 395 गोणी कांदा लिलावात शेतकरीवर्गाने विक्रीस आणला असल्याची माहिती सचिव रूपेश कवडे, कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.
प्रति 10 किलोस मिळालेले भाव
एक्स्ट्रा गोळा : 150 ते 171
सुपर गोळा : 130 ते 150
सुपर मीडियम : 110 ते 130
गोल्टी व गोल्टा : 90 ते 110
बदला व चिंगळी : 30 ते 80