ओतूर: चांगला दर मिळेल या आशेने अनेक शेतकर्यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपला कांदा साठवून ठेवला होता. मात्र, कांदाचाळीत जतन केलेल्या कांद्याला आताही अगदीच कमी बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.
ओतूर (जुन्नर) उपबाजारात गुरुवारी (दि. 24) कांद्याच्या 13 हजार 485 पिशव्यांची आवक झाली होती. यावेळेस प्रति 10 किलोस गोळा कांदा 160 ते 201, सुपर कांदा 110 ते 160, गोल्टी 30 ते 110 तर बदला कांदा 20 ते 80 रुपये बाजारभावाने विक्री करण्यात आली. याबाबत उपबाजार कार्यालय व्यवस्थापक सतिश मस्करे यांनी माहिती दिली. (Latest Pune News)
कांद्याला गेल्या तीन वर्षांत योग्य बाजारभाव मिळालेले नाही. गत काळात कांदा या पिकाला बाजारभाव मिळतीलच याची कोणतीही खात्री नसतानाही शेतकर्यांनी कांदालागवड मोठ्या प्रमाणात केली होती. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने अगाप कांदा रोपे नष्ट झाली होती.
बियाण्यांचा महागडा खर्च पेलून शेतकर्यांनी पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला. दुबार कांदा रोपे जगवून यंदाचे पीक हातात पडेपर्यंत कमालीचा त्रास शेतकर्यांनी सहन केला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
महागडी खते, औषधे, मजुरीचे, वाहतुकीचे, डिझेलचे वाढलेले दर यामुळे कांदा उत्पादित करताना एकरी 70 ते 80 हजार रुपये इतका खर्च होत आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने तसेच नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे, याकडे शासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.