

बारामती: लातूर जिल्ह्यातील औसा येथे अल्पवयीन एचआयव्हीबाधित मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. त्यातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
लैंगिक अत्याचारानंतर गर्भपात केला गेला, असे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. यासंबंधी शुक्रवारी (दि. 25) झिरो एफआयआर डोकी येथे दाखल झालेली आहे. हा गुन्हा औसा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रजितवाड यांच्या मी संपर्कात आहे, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले. (Latest Pune News)
संबंधित मुलीची वैद्यकीय तपासणी झाली आहे. या प्रकरणात संस्थाचालकांनी दुर्लक्ष केले आहे का? अधीक्षकांचे दुर्लक्ष होते का? जिल्हा महिला बालविकासच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा सखोल तपास करावा, अशा सक्त सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
एफआयआरमध्ये जो घटनाक्रम सांगितला आहे, काही व्यक्तींची नावे घेतली आहेत; परंतु वैद्यकीय तपासणी अहवालानंतर बर्याच गोष्टी समोर येतील. संस्थेच्या माध्यमातून काही बेजबाबदारपणा झाला असेल, तर त्यांच्यावरही कारवाई होईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही चाकणकरांनी सांगितले.
कोकाटे यांनी केलेले विधान चुकीचेच
कृषिमंत्री कोकाटे यांनी केलेले विधान चुकीचेच असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेसाठी अन्य कोणाचाही निधी घेतला नसल्याचे अर्थमंत्री अजित पवार वारंवार सांगत आले आहेत. याप्रकरणी विरोधकांकडून आरोप होत असले, तरी आरोप करणे आणि प्रत्यक्षात आरोप सिद्ध होणे यात फार तफावत आहे.
लक्ष्मण हाके यांनी महाज्योतीला निधी दिला जात नसल्याचे सांगितल्याच्या प्रश्नावर चाकणकर म्हणाल्या, पवार यांनी याप्रकणी खुलासा केला आहे. केवळ एखाद्या व्यक्तीला बदनाम करणे, त्या व्यक्तीवर टीका करणे आणि स्वतःचे नाव मोठे करणे असे जर कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे.
पवार मुख्यमंत्री व्हावेत, ही इच्छा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. गेली अनेक वर्षे आम्ही पक्षात काम करतो. आपला नेता मोठा व्हावा, असे कार्यकर्त्यांचे स्वप्न असते. केवळ माझीच नाही, तर राज्याच्या कानाकोपर्यातील कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत. भावना व्यक्त करणे गैर नाही. त्यासाठी आम्हाला जबाबदारी पार पाडावी लागेल.