Onion Crisis pudhari photo
पुणे

Onion Farmers Crisis: कांदा उत्पादकांचा आक्रोश : ‘जगायचे की मरायचे?’; दर कोसळल्याने शेतकरी हतबल

निर्यातबंदी, युद्धाचा फटका आणि वाढता खर्च; जुन्नरमधील बळीराजा आर्थिक संकटात

पुढारी वृत्तसेवा

ओतूर : ‌ ‘कांद्याचे कोठार‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील शेतकरी सध्या तीव आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याला मिळणारा भाव मातीमोल ठरल्याने शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. एकेकाळी ‌‘सोन्यासारखा‌’ दर देणारा कांदा आज बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे.

ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह परिसरातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असली, तरी मागणी घटल्याने दर कोसळले आहेत. यंदा उत्पादन भरघोस झाले; मात्र हेच वाढीव उत्पादन

आता शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, अहिनवेवाडी, उदापूर, डिंगोरे, उंबज, खामुंडी, डुंबरवाडी आणि धोलवड या गावांतील कांदा उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडले आहेत.

जुन्नरच्या कांद्याला आखाती देशांमध्ये मोठी बाजारपेठ असतानाही केंद्र सरकारच्या अनिश्चित निर्यात धोरणामुळे निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. याशिवाय, जागतिक स्तरावरील युद्ध परिस्थितीमुळे इंधन दरवाढ, वाहतूक खर्च आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाला आहे. याचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर झाला असून, स्थानिक बाजारपेठेतही खरेदीदारांचा अभाव जाणवत आहे.

दरम्यान, एका एकर कांदा उत्पादनासाठी सुमारे 80 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च येत असताना सध्या बाजारात केवळ 9 ते 11 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. या तफावतीमुळे शेतकरी अक्षरशः कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून, आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

बळीराजाचा सवाल

निर्यात धोरणाचा अभाव, वाढते उत्पादन खर्च आणि कोसळलेले दर यामुळे जुन्नरचा कांदा उत्पादक अक्षरशः हतबल झाला असून, “आम्ही जगायचे की मरायचे?” असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही कांद्याला भाव मिळेल या आशेवर आहोत. मात्र, दर वर्षी सरकारकडून निराशाच पदरी पडते. खत, मजुरी वाढली; पण दर तसाच आहे. कायमस्वरूपी निर्यात धोरण नसेल, तर आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल.

- डॉ. गणपत डुंबरे, शेतकरी, ओतूर

नोकऱ्या सोडून शेतीकडे वळलो; पण आता तीच तोट्याची ठरली. जुन्नरचा कांदा जगप्रसिद्ध असताना बाजारपेठ कोसळली आहे. कोल्ड स्टोरेज आणि थेट निर्यात सुविधा तातडीने द्याव्यात.

- अनिल बोडके, शेतकरी, खामुंडी

माल नसताना दर वाढतात आणि माल आल्यावर कोसळतात. बाजार समितीत माल आणण्याचा खर्चही निघत नाही. सरकारने हमीभाव किंवा थेट अनुदान द्यावे.

- प्रथमेश तांबे,

शेतकरी, ओतूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT