पुणे

दूषित हवामानाचा कांदा पिकाला फटका : शेतकर्‍यांवर संकट

Laxman Dhenge

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : सततच्या दूषित हवामानाचा फटका आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांनी घेतलेल्या कांदा पिकाला बसला आहे. कांदा पिकाच्या पातींवर रस शोषित किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे, तसेच मावा, आकडी या रोगांचादेखील प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता महागड्या औषधांची फवारणी शेतकर्‍यांनी कांदा पिकावर सुरू केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी घेतले आहे.

यंदा कांदा पिकाला लागवडीनंतर सुरुवातीपासूनच दूषित हवामानाचा फटका बसला आहे. सततचे ढगाळ हवामान, त्यानंतर पडलेला अवकाळी पाऊस, दाट धुके याचा परिणाम कांदा पिकावर झाला. कांदा पिकावर मावा, आकडी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पिकाच्या पातींवर रसशोषित कीडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने कांदापाती पिवळ्या पडून वाकल्या आहेत. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी कांदा पिकावर महागड्या औषधांची फवारणी सुरू केली आहे. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT