कुठल्याही चित्रपट महोत्सवाची खासियत हे चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षक असतात. इथं गर्दी नव्हे तर दर्दी महत्त्वाचे असतात. आजकाल सर्वच चित्रपट महोत्सवांचं लोकशाहीकरण झालेलं आहे. ज्युरी स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट सिनेमे ठरवतात. पण प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरवण्याचा अधिकार देण्यात आलाय. त्यासाठी मतदान होतं. शेवटच्या दिवशी ही मतपेटी उघडण्यात येते. अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अकी कुरोस्तामीचा 'फॉलेन लिव्ह' हा प्रेक्षकांच्या पसंतीचा ठरला.
अजिंठा-वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. त्याच नावानं सुरू झालेला चित्रपट महोत्सव जागतिक सिनेमांसोबतच मराठवाड्यातल्या स्थानिक सिनेमांना वैश्विक ओळख देणारा ठरत आहे. अजिंठा-वेरुळ फिल्म फेस्टिव्हल खर्या अर्थानं इंटरनॅशनल बनण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षांपासून सुरू झाली. चित्रपट महोत्सवाचा दर्जा अधिकाधिक वाढवण्यावर आयोजकांनी भर दिला आहे. जगभरातल्या चांगल्या फिल्म्स् आणि जागतिक सिनेमाशी संबंधित लोकांना इथं घेऊन येणं, याकडे लक्ष देण्यात आलं आहे. त्याचं सर्व श्रेय जातं आयोजक कमिटीला. या कमिटीला दोन भागांमध्ये विभागण्यात आलं. पहिला भाग ज्येष्ठ मार्गदर्शकांचा आणि दुसरा भाग व्हॉलेंटियर्सचा. जुन्या जाणत्यांनी अनुभवाची शिदोरी उघडून दिली. नव्यांनी संधीचं सोनं केलं, याचा प्रत्यय या फिल्म फेस्टिव्हलमध्ये आला.
व्हॉलेंटियर्सच्या जोरावर चित्रपट महोत्सवाचा डोलारा असतो. ग्राऊंड लेव्हलला काम करणारा कार्यकर्ता चांगला पाहिजे. महोत्सवाचं अर्ध यश त्यावरच अवलंबून असतं. अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानं कार्यकर्त्यांची फौजच तयार केली. या आधी व्हॉलेंटियर्सच्या जोरावर सक्सेसफूल ठरलेला केरळातला फिल्म फेस्टिव्हल अनुभवला होता. तसेच किंबहुना त्यापेक्षा जबरदस्त को-ऑर्डिनेशन संभाजीनगरात अनुभवायला मिळालं. कार्यकर्ते फक्त धावणारे नसावेत, तर दाखवल्या जाणार्या प्रत्येक फिल्मशी नातं सांगणारे हवेत. इथले सर्व व्हॉलेंटियर्स मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी होते. त्यांना संवादाची कला चांगलीच अवगत होती. डेलिगेट्सच्या रजिस्ट्रेशनपासून ते त्यांच्या स्क्रिनिंगच्या रांगेपर्यंत सर्वच ठिकाणी ते राबत होते.
प्रत्येक फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म स्पर्धा असते, ती इथंही होती. शिवाय भारतातल्या दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांची स्पर्धा फार महत्त्वाची ठरली. सिनेमाची ओपनिंग फिल्म होती 'फॉलन लिव्ह' (2023), दिग्दर्शक अकी किरोस्तामी. जर्मनी आणि फिनलँड या दोन देशांनी मिळून सिनेमाची निर्मिती केलीय. तर फ्रान्समधल्या 'अॅनाटोमी ऑफ फॉल' (2023) या जस्टिन ट्रायट या दिग्दर्शिकेच्या सिनेमानं सांगता झाली. तर भारतीय सिनेमांच्या यादीत 'कयो कयो कलर' ( शाहरुख खान चावडा), 'फॅमिली' (डॉन पलाथरा), 'व्हिस्पर्स ऑफ फायर अँड वॉटर' (लुबधक चॅटर्जी) 'इट्स ऑल इन युवर माईंड' (ध्रुव सोलंकी), 'कोराम्मा' (शिवध्वज रेड्डी) 'स्थळ' (जयंत सोमालकर) आणि 'वल्ली' (मनोज शिंदे) असे नऊ तगडे सिनेमे भारतीय सिनेमांच्या स्पर्धेत एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे होते. कॉम्पिटिशन टफ होती. त्यामुळं परीक्षकांनाही जोर लावावा लागला. हे परीक्षक होते ध्रितीमन चॅटर्जी (ज्युरी, चेअरमन) नचिकेत पटवर्धन, रश्मी दोरायस्वामी, हरी नायर आणि दिमो पोपोव (नॉर्थ मॅसेडोनिया). 'फिप्रेस्की' या जागतिक फिल्म क्रिटिक असोसिएशनचे तीन ज्युरी प्रो मनु चक्रवर्ती, श्रीदेवी पी अरविंद आणि सचिन चट्टेदेखील स्पर्धेतल्या सिनेमांचं परीक्षण करणार होते. शिवाय मराठवाड्यातल्या स्थानिक दिग्दर्शकांची शॉर्ट फिल्म स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. असे हे तगडं लाईनअप पाहण्यासाठी दहा हजार डेलिगेट्सनीही गर्दी केली, हे विशेष.
कुठल्याही चित्रपट महोत्सवाची खासियत हे फिल्म पाहायला आलेले प्रेक्षक असतात. इथं गर्दी नव्हे तर दर्दी महत्त्वाचे असतात. महोत्सवामध्ये दर्दी प्रेक्षक आलेत का, याची चाचपणी करायची कशी? आजकाल सर्वच चित्रपट महोत्सवांचं लोकशाहीकरण झालेलं आहे. ज्युरी स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट सिनेमे ठरवतात. पण प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरवण्याचा अधिकार देण्यात आलाय. त्यासाठी मतदान होतं. चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ही मतपेटी उघडण्यात येते. आता ते सर्व ऑनलाईन होत असल्यानं 'व्होट ऑफ युवर फेव्हरेट मुव्ही' असं कॅम्पेन होतं. अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये अकी कुरोस्तोमीचा 'फॉलेन लिव्ह' (2023) प्रेक्षकांच्या पसंतीचा ठरला. यापूर्वी कान्स ते टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. संभाजीनगरातल्या दर्दी प्रेक्षकांनीही त्याचीच निवड केली. याचा अर्थ असा, की जागतिक सिनेमासाठी प्रेक्षक तयार करण्याची जबाबदारी फिल्म फेस्टिव्हल्सवर असते. ती अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानं योग्य पार पाडली आहे.
महोत्सवामध्ये मिळणार्या पुरस्काराच्या किमतीपेक्षा सिनेमाला मिळणारी ऑलिव्ह डहाळी महत्त्वाची असते. छोटा असो वा मोठा, चित्रपट महोत्सवाच्या या नावासह असलेली ऑलिव्ह डहाळी सिनेमाची ओळख बनते. अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानं यात आता एक पाऊल पुढे टाकलंय. चांगल्या सिनेमांचे प्रेक्षक तयार करण्यासोबत आता चांगले सिनेमा-समीक्षक तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. स्थानिक तरुण किंवा सिनेरसिकांना याचं प्रशिक्षण देण्यापासून त्यांच्याकडून सिनेमासंदर्भातलं सर्वोकृष्ट समीक्षण लिहून घेण्यापर्यंतचं काम आता अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलतर्फे केलं जात आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलीय. यांत्रिक प्रगतीमुळं आणि आयफोनसारखे अद्ययावत मोबाईल तंत्रज्ञान यामुळे सिनेमा तयार करणं सोप झालंय. पण उत्तमोत्तम सिने-समीक्षक आणि सिने-संशोधक तयार करण्यासाठी असे चित्रपट महोत्सव हे एक मैलाचं पाऊल ठरणार आहे.
शहरभरात अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे बॅनर लागले होते. जावेद अख्तर, आर. बाल्की, अनुभव सिन्हा आणि आशुतोष गोवारीकर अशी तगडी नावं झळकत होती. फेस्टिव्हल व्हेन्यू, प्रोझॉन मॉल्सकडे जाणार्या सर्व रस्त्यांवर पोस्टर्स दिसत होती. यंदाचं नववे वर्ष होते. ज्येष्ठ सिने-समीक्षक आणि लेखक अशोक राणे या फेस्टिव्हलचे डायरेक्टर आहेत. जगभरातल्या फिल्म फेस्टिव्हल सर्कलमध्ये त्यांची मुसाफिरी आहे. कधी ज्युरी म्हणून तर कधी साधा प्रेक्षक म्हणून. त्याचं हे संचित अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसतं. फेस्टिव्हलची मांडणी जागतिक ठेवताना लोकल फिल्म इंडस्ट्रीला खासकरून विद्यार्थ्यांसाठी ती पर्वणी राहील, हे पाहिलं गेलं. जगभरातले 60 हून अधिक सिनेमे इथं दाखवण्यात आले. एमजीएम विद्यापीठातल्या फिल्म स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या फिल्म इथं दाखवण्यात आल्या. म्हणजेच लोकल ते ग्लोबल असं भन्नाट कॉम्बिनेशन इथं तयार झालं होतं.