पुणे: जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडी कमी झाली आहे. परिणामी रब्बी पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने आंबेगाव, पुरंदर, बारामती, खेड, इंदापूर या तालुक्यात हे प्रमाण अधिक आहे. या बदलत्या वातावरणामुळे गहू, हरभरा, कांदा व तरकारी पिकांवर रोग व कीड पडली आहे. यामुळे शेतकरी चिंताग््रास्त झाले आहेत.
खेड तालुक्यात रब्बी हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, यंदा वातावरणातील अनिश्चित बदल आणि अपेक्षित थंडी न पडल्याने कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोगामुळे कांद्याची पाने करपून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.
तालुक्यात हजारो हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. डिसेंबरमध्ये आर्द्रतेत वाढ आणि तापमानातील चढउतार यामुळे करपाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. पानांवर पांढरे डाग पडून प्रकाशसंश्लेषण कमी होते आणि रोपांची वाढ खुंटते, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली.
ढोरे भांबुरवाडी येथील शेतकरी पांडुरंग ढोरे म्हणाले, ’कांद्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सुमारे 50 ते 70 हजार रुपयांचा खर्च येतो. यात रोपे, वाफे तयार करणे, खतांचा वापर आणि मजुरांचा समावेश असतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे हा सर्व खर्च व्यर्थ जात आहे. करपा रोग नियंत्रित करण्यासाठी औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च करावा लागत असून, प्रति फवारणीसाठी 2 ते 3 हजार रुपये खर्च होत आहेत. तरीही रोग पूर्णपणे नियंत्रणात येत नाही.’
कृषी विभागाने मॅंकोझेब, मेटॅलॅक्सिल यांसारख्या फंगीसायड्सचा वापर करावा तसेच नियमित तपासणी करावी, असा सल्ला दिला आहे. पण मागील हंगामातील दरघटीचा फटका बसलेल्या अनेक शेतकऱ्यांना वाढीव खर्च परवडत नाही. राजगुरुनगरजवळील चांडोली येथे राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र असून रोपोत्पादनापासून उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. या भागात विशेष अभियान राबवून शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच विमायोजना अधिक प्रभावी करून कृषी रसायनांवर अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली आहे.