Pune News
पुणे : सुखी संसाराच्या एक वर्षानंतर पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद आणि स्वभावातून वाढलेल्या वादातून साडे तीन वर्षात एकमेकांविरोधात सात दावे दाखल झाले. दाम्पत्यांमधील हा वाद मिटून त्यांना नव्याने आयुष्य सुरू करता यावे यासाठी पती-पत्नीच्या वकीलांनी मध्यस्थीचा निर्णय घेतला. अखेर, भांडणातून काही साध्य होणार नसून त्यामुळे दोघांनाही शारिरीक, मानसिक त्रासाला सामोरे जाऊन आर्थिक नुकसानही सोसावे लागेल हे समुपदेशनादरम्यान वकिलांनी पटवून दिल्यानंतर अखेर दोघांनी परस्परसंमतीने विभक्त होण्याचा मार्ग स्विकारला. अन् वर्षभराचा संसार, तीन वर्षांचे भांडण आणि सात दावे संपुष्टात आले.
नील आणि सई (दोघांचीही नावे बदलली आहेत) अशी पती-पत्नीची नावे आहेत. नील हा अभियंता असून, नामांकित कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. सई बेरोजगार असून, एमपीएससीचा अभ्यास करत आहे. 10 जानेवारी 2021 रोजी दोघांचा विवाह झाला. एक वर्ष सुरळीत संसार सुरू होता. 15 जानेवारी 2022 पासून वाद वाढत गेला. यादरम्यान, दोघांकडूनही एकामेकांच्या कुटुंबाच्या विरोधात दावे दाखल करण्यात येत होते. ती नवर्याच्या घरातच राहत होती. त्यासाठी तिने कौटुंबिक हिंसाचाराच्या दाव्यात आदेश घेतला होता. तसेच तिला दरमहा 12 हजार पोटगीही न्यायालयाने मंजुर केली होती. दोघातील वाद सुरूच होते.
पती-पत्नीमधील हा वाद मिटून त्यांना नव्याने आयुष्य सुरू करता यावे यासाठी पती-पत्नीच्या वकीलांनी मध्यस्थीचा निर्णय घेतला. यावेळी, पतीचे वकील अॅड. विकास ढगे पाटील आणि पत्नीच्या वकील अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांनी दोघा पती-पत्नीचे समुपदेशन केले. भांडण करून काहीही साध्य होणार नाही. दोघांना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. आर्थिक नुकसानही होणार असल्याचे दोघांच्या वकिलांनी समुपदेशनाद्वारे पटवून दिले. त्यानंतर, दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. अर्जानुसार पतीने तिला 10 लाख रुपये, स्त्रीधन असलेले 5 तोळे सोने आणि तिचे सर्व साहित्य तिला परत दिले. तसेच, दोघांनीही एकमेकांविरोधात दाखल केलेले सात दावे माघारी घेण्याचे कबुल केले. त्यानंतर, न्यायालयाने परस्परसंमतीने केलेला घटस्फोट मंजुर केला.
परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने केलेल्या अर्जानुसार सहा महिन्याचा कुलिंग पिरीडचा कालावधीत वगळण्यात आला. परिणामी, लवकर निकाल झाला. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत. भांडण मिटण्यात मध्यस्थीचे महत्त्व दिसून आले.- अॅड. राणी कांबळे-सोनावणे, पत्नीच्या वकील.