

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीत एक किंवा दोन विषयांमध्ये नापास असणार्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या माध्यमातून अकरावीत प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे; परंतु सीबीएसई, सीआयएसई, आयजीसह अन्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांना मात्र दहावी उत्तीर्ण असल्याशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांबाबतीत असा भेदभाव का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना येणार्या समस्यांसंदर्भात एक प्रकटन जाहीर केले आहे. यामध्ये एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश देत असताना ही सवलत कोणाला लागू आहे आणि एटीकेटीच्या अर्ज कधी करता येईल, यासंदर्भात माहिती दिली आहे. (Latest Pune News)
डॉ. पानझाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाच्या दहावीमध्ये एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी शासनाने एटीकेटी सवलत लागू केलेली आहे. ही सवलत केवळ महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळाचा इयत्ता अकरावीमध्ये (इयत्ता दहावी सर्व विषय उत्तीर्ण होईपर्यंत) तात्पुरता प्रवेश दिला जातो.
एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशासाठी अर्ज करण्याची संधी दहावी पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर (साधारणपणे विशेष फेरी 1 नंतर) दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना एटीकेटी सवलत मिळालेली आहे. त्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरता येतील. (इंग्रजी विषयात एटीकेटी असेल तरीही) भविष्यात इंग्रजी विषय उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीमध्ये विज्ञान शाखा घ्यायची असल्यास दहावीमध्ये विज्ञान विषयात 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.
अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनाही त्या मंडळाने अशा प्रकारची अर्थात पुरवणी परीक्षेची सवलत लागू केली असल्यास ती त्याच मंडळाच्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी लागू असेल. राज्य मंडळातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत लागू होणार नाही. त्यामुळे अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना स्पष्ट उत्तीर्ण झाल्याशिवाय राज्यमंडळ अकरावी प्रवेशासाठी अर्ज करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेश फेरीच्या पाचही टप्प्यांवर नोंदणी व प्राधान्यक्रम भरण्याची संधी
राज्यामध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण होणार्या राज्य मंडळ संलग्न शाळांमधून 13 लाख 87 हजार मुले सन 2025 च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच, अन्य मंडळाद्वारे चालविल्या जाणार्या शाळांमध्ये साधारणपणे 1 लाख 40 हजार मुले उत्तीर्ण झालेले आहेत. या दोन्हीचा एकत्रित विचार करता 15 लाख 20 हजार मुले साधारणपणे इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत.
एकूण उत्तीर्ण झालेल्या मुलांपैकी राज्यामध्ये दरवर्षी साधारणपणे इयत्ता अकरावीमध्ये राज्य मंडळ संलग्न शाळांमध्ये 13 लाख मुले प्रवेशित होतात. अन्य मुले ही व्यवसाय शिक्षण, तंत्रशिक्षण, नर्सिंग अशा कोर्सेसला दहावीनंतर प्रवेश घेतात.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये दिनांक 5 जून 2025 अखेर 12 लाख 71 हजार मुलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 12 लाख 5 हजार मुलांनी शंभर रुपये शुल्क भरून त्यांचा प्रवेशाचा भाग एक पूर्ण केला आहे. प्रवेश फेरीच्या पाचही टप्प्यांवर कोणत्याही विद्यार्थ्याला नोंदणी व प्राधान्यक्रम भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.